संगमनेर |वार्ताहर| Sangamner
स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट या अॅप्लीकेशनमधील स्मार्ट उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना पुन्हा एकदा विद्यार्थी ऑनलाईन उपस्थितीचे काम करावे लागणार आहे. परिणामी शिक्षकांचे काम पुन्हा वाढणार आहे. यामुळे शिक्षक संघटना राज्यभर आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अगोदरच विविध अशैक्षणिक कामाने शिक्षक बेजार झाले आहेत. कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता ऑनलाईन कामे शिक्षकांच्या मस्तकी मारली जात आहेत. त्यात आणखी एका कामाची नव्याने भर पडल्याने शिक्षण संघटना आक्रमक भूमिका घेणारा असे चित्र आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या संचालकांच्या नियंत्रणाखाली विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन व विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान व सुलभ व्हावी. तसेच धोरणकर्ते, शिक्षक आणि सर्व स्तरावरील प्रशासकांसह विविध भागधारकांना माहिती विश्लेषणासाठी एकत्रित व्यासपीठ उपलब्ध व्हावे. तसेच त्याआधारे राज्य, जिल्हा व तालुका पातळीवर गरजा लक्षात घेऊन उपक्रम, योजना आखण्यास मदत व्हावी, यासाठी विद्यार्थी उपस्थितीची माहिती आवश्यक आहे.
स्विफ्ट चॅट या अॅप्लीकेशनमधील स्मार्ट उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्याची प्रक्रिया 1 डिसेंबर 2023 पासून सुरू करण्यात आलेली होती. परंतु, जिल्हास्तरावरील क्षेत्रीय अधिकार्यांमार्फत याबाबत नियमित आढावा घेणे, तसेच सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्यामध्ये अनियमितता दिसून आली आहे. मात्र, सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थित्ती नोंदविण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना स्मार्ट विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशा सूचना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखाराव यांनी दिल्या आहेत. यासाठी शिक्षकांनी प्ले स्टोअरवरून स्विफ्ट चॅट हे अॅप्लीकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे. या चॅटबॉटवर दोन सत्रात भरणार्या शाळांसाठी सकाळी 7 ते दु. 12 तर अन्य शाळांसाठी सकाळी 10 ते सायं. 5 या कालावधीत उपस्थितीची नोंद करायची आहे.
ऑनलाईन कामाला शिक्षक वैतागले..
राज्यातील शिक्षक सतत काही ना काही कामानिमित्ताने ऑनलाईन ठेवले जात आहेत. विविध माहितीसाठी विविध संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहेत. त्या प्रत्येक संकेतस्थळावर विद्यार्थी, शाळा, शिक्षक यांची माहिती सविस्तरपणे नोंदवली जात आहे. शालेय पोषण आहारची माहिती दैनंदिन ऑनलाईन करण्यात आली आहे. शिष्यवृत्ती फॉर्म, शिक्षकांचे वेतन, विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र, द्वितीय सत्र, पायाभूत चाचणी शासनाच्यावतीने घेण्यात येत असलेल्या विषयांचे गुण देखील ऑनलाईन नोंदवण्यात येत आहेत. अनेक कामे ऑनलाईन केली जात आहेत. त्यातच विद्यार्थी रोजची उपस्थिती या कामाची नव्याने भर पडणार आहे. त्यामुळे शिक्षक वैतागून गेले असल्याच्या तक्रारी संघटनांनी यापूर्वी केल्या आहेत. सातत्याने ऑनलाईन कामे वाढत असल्याने शिक्षक संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे.