दिंडोरी । प्रतिनिधी Dindori
खरी गुणवत्ता ही ग्रामीण भागात असते. ग्रामीण भागातल्या मातीशी इमान ठेवले तर ही माती सुद्धा आपल्याला यश मिळवून देते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्य आणि प्रयत्न हे करावेच लागतात. विद्यार्थ्यांनी निराश न होता ध्येयप्राप्तीसाठी मनात प्रबळ इच्छाशक्ती बाळगून सातत्य ठेवावे असे प्रतिपादन ख्यातनाम संमोहन तज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी केले.
दिंडोरी येथे दै. ‘देशदूत’ व ‘गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज’च्या वतीने ‘दिंडोरी एक्सलन्स अवार्ड’ तसेच इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी डॉ. शैलेंद्र गायकवाड बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे, नगराध्यक्ष सुनीता लहांगे, उपनगराध्यक्ष माधुरी साळुंखे, नगरसेविका लता बोरस्ते, देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन कापडणी, वितरण व्यवस्थापक पराग पुराणिक, प्रकाश पिंगळ, रामदास पिंगळ, सोमनाथ सोनवणे, दिनकर जाधव, अवनखेडचे सरपंच नरेंद्र जाधव, वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, लखमापूरच्या सरपंच संगीता देशमुख आदींसह विविध गावातील सरपंच, विविध शाळेचे मुख्याध्यांपक, प्राचार्य, शिक्षकवृंद उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थी आणि पालकत्व यावर दिलखुलास चर्चा केली. विद्यार्थ्यांनी तनावहीत कसे राहावे, याचे सखोल मार्गदर्शन केले. मनामध्ये आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने आपण बनतो आणि तीच गोष्ट पुढे साकार होत चालते असे ते म्हणाले. गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज ही खरोखर इंटरनॅशनल संस्था आहे असे शैलेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले राजू वाघ यांना ‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. वाघ यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना ध्येय निश्चित करून वाटचाल करण्याचे आवाहन केले. अनेकदा विद्यार्थी अपयश आले तर प्रयत्न सोडतो, परंतु जर प्रयत्न आणि दिशा कायम ठेवले तर यश नक्कीच मिळते असे ते म्हणाले.
‘देशदूत’चे सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी गुरुकुल संस्थेला कौतुकाची थाप दिली. त्याचबरोबर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असून या गुणवत्तेला तोड नसल्याचे ते म्हणाले. दिंडोरी हा विकासाकडे जाणारा तालुका असून आत्तापासूनच विद्यार्थ्यांची गुणवत्ता ही लक्षवेधी ठरविण्यात असून भविष्यातही दिंडोरीची वाटचाल ही जिल्ह्यात अग्रेसर राहील असे ते म्हणाले. त्याचबरोबर ‘देशदूत’ फाऊंडेशनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलशिप देण्यात येणार असल्याचे आश्वासन सल्लागार संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी देताच विद्यार्थ्यांमध्ये टाळ्याचा गडगडाट झाला.
‘देशदूत’चे महाव्यवस्थापक अमोल घावरे यांनी ‘देशदूत’ची वाटचाल विशद केली.
यावेळी गुरुकुल शिक्षण संस्थेचे संचालक सोमनाथ सोनवणे यांनी सांगितले की, आम्ही केवळ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करत नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यावर आमचा भर असतो. कोणत्याही शाळेतील विद्यार्थी असो त्यांचा गुणगौरव होणे गरजेचे आहे. समाजाप्रती यांचे यश पुढे जावे, यासाठी या गुण गौरव शाळेने आयोजन केले असल्याचे संचालक सोमनाथ सोनवणे यांनी सांगितले.
आम्ही दिंडोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी 2030 चे स्वप्न पाहिले असून ए आय तंत्रज्ञान शाळेत शिकून विद्यार्थी प्रकल्प करण्याचा मानस असल्याचे अमोल देशमुख यांनी सांगितले.
‘देशदूत’चे दिंडोरी विभागीय कार्यालयप्रमुख नितीन गांगुर्डे यांनी प्रास्ताविक करून ‘देशदूत’ने दिंडोरीकारांची नाळ जोडली असून एकमेकांच्या सहकार्याने दिंडोरी तालुक्याचा विकास करणार असल्याचे सांगितले. ‘देशदूत’ दिंडोरीकरांच्या समस्यांना कायम न्याय देत असल्याचे नितीन गांगुर्डे यांनी सांगितले.
यावेळी इयत्ता दहावी व बारावी तसेच क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तालुक्यातील विविध गावातून आलेल्या सरपंच तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक यांना सुद्धा देशदूत व गुरुकुल स्कूलच्या वतीने गौरवण्यात आले. त्यामुळे सर्वच वातावरण विद्यार्थ्यांमुळे भारून गेले होते. विद्यार्थ्यांचे पालकही या कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबून होते. त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे कौतुक केले.
‘देशदूत’ व गुरुकुल संस्थेने दिंडोरीकरांसाठी अजून कार्यक्रम घ्यावेत असे अपेक्षा अनेक पालकांनी बोलून दाखवली. स्वागत दिंडोरी देशदूत विभागीय कार्यालयप्रमुख नितीन गांगुर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन कुलकर्णी यांनी केले तर आभार ‘देशदूत’चे जाहिरात व्यवस्थापक अमोल घावरे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याने देशदूतचे व गुरुकूल स्कूलचे उपस्थितांनी कोैतुक केले.