श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
राज्यातील 96 सहकारी व 95 खासगी असे 191 साखर कारखान्यांचा सन 2024-25 चा गळीत हंगाम प्रगतिपथावर आहे. या कारखान्यांनी आजवर 380 लाख मे.टनाचे गाळप केले असून सरासरी 8.65 साखर उतार्याने 325 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. दिवाळी सण व पाठोपाठ विधानसभा निवडणूक यामुळे यंदा ऊस गळित हंगाम उशिराने सुरु झाले. यामुळे उसाचे गाळप नियोजित वेळेपेक्षा लांबले. यामुळे ऊस उत्पादन व साखर उतार्यात घट येत आहे. याचा फटका राज्यातील साखर कारखाने तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सन 2024-25 चा ऊस गळीत हंगाम 1 नोव्हेंबर रोजी सुरू होणे अपेक्षित होते. साखर कारखान्यांनी तसे नियोजनही केले होते. मात्र, दरम्यान विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यामुळे बहुतांश ऊस तोडणी मजूर मतदानासाठी आपापल्या गावीच थांबले. मतदानानंतर ऊस तोडणी मजूर साखर कारखान्यांवर पोहचण्यास एक आडवड्याचा कालावधी गेला. या कारणास्तव गाळप हंगाम सुमारे तीन आठवडे विलंबाने सुरू झाला.
गळितास विलंब झाल्याने ऊस तोडणी कार्यक्रम लांबला. याचा परिणाम म्हणून ऊस उत्पादन व साखर उतार्यात घट येत असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक सरासरी 10.16, पुणे विभागात 8.74, सोलापूर विभाग 7.48, नगर विभाग 8.01, नांदेड विभाग 8.74, अमरावती विभाग 8.15 तर छ.संभाजीनगर विभाग सर्वात कमी सरासरी 7.2 इतक्या साखर उतार्याची नोंद झाली आहे. साखर उतारा घटीचा थेट परिणाम साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. उसाचा दर म्हणजे एफ.आर.पी.साखर उतार्यावर ठरते त्यामुळे साखर उतार्यात घट झाल्यास त्याचा फटका ऊस उत्पादक शेतकर्यांना बसणार आहे.
याशिवाय अनेक शेतकरी ऊस तुटून गेल्यावर गहू, हरभरा आदी रब्बीची पिके घेतात. मात्र, डिसेंबर उलटूनही ऊस न तुटल्याने रब्बी हंगाम हातचा जाण्याच्या भितीने शेतकरी धास्तावले आहेत. यंदा उसाचा तुटवडा असल्याने साखर कारखाने एकमेकांच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करुन उसाची पळवापळवी करीत आहेत. शेतकरीही लवकर ऊस तुटून जावा म्हणून जो कारखाना जास्तीचा भाव देईल त्या कारखान्याला ऊस देत असल्याचे चित्र आहे. एकूणच यंदाचा गळित हंगाम साखर कारखान्यांच्या अर्थकारणावर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.