करंजी |प्रतिनिधी| Karanji
शेतकर्यांनी निराश न होता आत्महत्या करू नये व आपल्या संपूर्ण कुटुंबाला उघड्यावर आणू नये. म्हणून नैराश्य आलेल्या शेतकर्यांसाठी शेतकरी समुपदेशन केंद्र स्थापन करून शेतकर्यांना दिशा देण्याचे काम व आत्महत्येसारख्या विचारांपासून दूर ठेवण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथील बाळासाहेब बाबुराव कोळसे या एका शेतकर्याच्या मुलाने महाराष्ट्रातील पहिले शेतकरी समुपदेशन केंद्र सुरू केले आहे.
आत्महत्यांनी प्रश्न सुटत नाहीत तर परिवार उघड्यावर येतो असे आवाहन कोळसे यांनी जन जागृतीतून केले आहे. सरकारने या शेतकरी पुत्राच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे बाळासाहेब कोळसे या शेतकरी पुत्राने स्वतः पुढाकार घेऊन लाईफ लाईन फाउंडेशन ही संस्था व क्रांतिकारी शेतकरी संघ स्थापन करून, स्वतः आत्महत्या पूर्व उपायोजना म्हणून अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी लाईफ लाईन सेंटर (शेतकरी समुपदेशन केंद्र) सुरू करून तणावग्रस्त शेतकर्यांसाठी हेल्पलाईन सेवा (हेल्पलाइन नं 8888255225)चालू केली आहे.
कोळसे जिल्ह्यातील 14 तालुक्यांत गावोगावी जाऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबाला भेटी देत त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना धीर देत आहेत. दिनांक 6 जून रोजी कोळसे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेत शेतकरी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या व या कार्यात सहकार्य करण्याची विनंती केली.
बाळासाहेब कोळसे या युवा शेतकर्याने 2021 व 2022 रोजी महाराष्ट्रभर सहा हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करून 36 जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांना शेतकरी आत्महत्या बाबतचे निवेदन दिले आहे. आत्महत्या झाल्यानंतर शेतकर्यांना मदत करण्यापेक्षा आत्महत्या पूर्व उपाययोजना करण्यात याव्यात. असे मत या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रभर सायकल भ्रमंती करत शेतकर्यांनी आत्महत्या करू नये, शेतकर्यांनी मृत्यूला न कवटाळता लढा देण्यासाठी तयार रहावे असे आवाहन ते करत आहेत.





