राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
गेल्या दहा ते पधंरा दिवसांपासून सूर्य अक्षरशः आग ओकू लागला आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. उष्णतेचा कहर असाच सुरु राहीला तर पुढचा मे महिना शेतकरीबांधवांसाठी अग्निपरीक्षेचे ठरणार असून उन्हाच्या प्रचंड कडाक्यामुळे शेती कामाचे पुर्ण नियोजन कोलमडले असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने सध्या सुरु असलेली उष्णतेची लाट आणखी तिन ते चार दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकर्यांची चिंता आणखी वाढली आहे. कधी नव्हे ते यंदा अनेक वर्षानंतर फेब्रुवारी महिना अखेर पर्यंत बर्यापैकी थंडी राहीली.
परंतु, त्यानंतर मात्र मार्च महिना सुरु होताच उन्हाचा कडाका वाढायला सुरुवात झाली. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून तपमानाचा पारा 41 अंशाच्या पुढे गेला आहे. सकाळी सात वाजल्या पासून प्रखर उन्हाला सुरुवात होत आहे. याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी 11 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. जणू काही अघोषित संचारबंदी सदृष परिस्थिती निर्माण झाल्याने कडक उन्हाळ्या पासून बचाव होण्यासाठी नागरिक थंडपेयाचा आसरा घेत आहे. तिव्र उष्णतेमुळे व ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उकाडा निर्माण होत असून घरात थांबणे देखिल मुश्कील झाले आहे. उकाड्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहताहेत. प्रचंड उष्णतेमुळे एसी व पंखे देखील विफल ठरत आहे. महावितरणचा विजपूरवठा अत्यंत कमी दाबाने सुरु असल्याने विजेवर चालणारी उपकरण देखील कुचकामी ठरल्याने अंगाची लाही-लाही होत आहे. यातून सुटका होण्यासाठी अनेक गर्द झाडांच्या सावलीचा आश्रय घेतांना दिसत आहे.
एकीकडे नागरिकांची अशी स्थिती असतांना दुसरीकडे मात्र शेतीच्या कामावर तिव्र उष्णतेचा विपरीत परिणाम झाला आहे. उन्हाच्या तिव्र कडाक्याने शेतातील पिके लवकर पाण्यावर येऊ लागली आहेत. प्रचंड उकाड्यामुळे झोप होत नाही. याचा आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. सध्या अनेक ठिकाणी शेतकर्यांची कांदा काढणी हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु प्रचंड उष्णतेचा त्यावर मोठा परिणाम झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे चारा पिके करपू लागली आहेत. त्यामुळे दुभत्या जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. व दुधाळ जनावरांच्या दुधावर त्याचा परिणाम झाला आहे. जनावरांची दूध देण्याची क्षमता यामुळे कमी झाली आहे. आधीच दूधाचे पडलेले मातीमोल दर त्यात उष्णतेचा कहर यामुळे एकंदरीत उष्णतेच्या लाटेचा फटका शेतकरी वर्गाला जास्त बसत आहे.




