Friday, May 3, 2024
Homeब्लॉगरविवार ‘शब्दगंध’ : काँग्रेससाठी ‘आशेचा नवा किरण’?

रविवार ‘शब्दगंध’ : काँग्रेससाठी ‘आशेचा नवा किरण’?

काँग्रेसशिवाय (congress) विरोधकांची आघाडी मजबूत होऊ शकत नाही याची काँग्रेस नेतृत्वाला पुरेपूर जाणीव आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे. ती ताकद वाढवण्याच्या निमित्ताने प्रियांका गांधी (priyanka gandhi) यांना पुढे आणण्याचा व विधानसभा निवडणुकीत (election) चमत्कार घडवण्याचा विचार काँग्रेसमधून पुढे आला असण्याची शक्यता असेल का? निमित्त उत्तर प्रदेशचे असले तरी काँग्रेसचे खरे लक्ष्य 2024 ची लोकसभा निवडणूक आहे, असे दिसते. कधीकाळी काँग्रेसचा भाग असणार्‍या ममता बॅनर्जी (mamta banerjee) काँग्रेसची जागा घेऊ पाहत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रियांका यांच्या रुपाने सक्षम चेहरा काँग्रेस नेतृत्व पुढे आणू पाहत आहे.

देशाला अनेक पंतप्रधान (prime minister) देणारा उत्तर प्रदेश (uttar pradesh) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. भारतीयच नव्हे तर विदेशी माध्यमांचेसुद्धा या राज्यातील घडामोडींकडे बारीक लक्ष असते. गेल्या वर्षी एका तरुणीवरील सामूहिक अत्याचाराने तेथील हाथरस गाव गाजले.

- Advertisement -

याआधी कधी चर्चेत नसलेले लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) गेल्या पंधरवड्यापासून केंद्रीय मंत्र्याच्या बरळण्याने व त्यांच्या पराक्रमी पुत्राने त्यावर केलेल्या प्रत्यक्ष कृतीने चांगलेच गाजत आहे. देशभर त्याचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीने लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ नुकताच एक दिवसाचा बंद (Maharashtra bandh) पाळला.

त्याच दिवशी काँग्रेसने देशव्यापी मूक आंदोलन (agitation) केले. विकासकामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री उत्तर प्रदेशात आले होते. केंद्र सरकारच्या (central government) शेतीविषयक कायद्यांना (agriculture bill) विरोध दर्शवण्यासाठी मंत्र्यांचा ताफा जाण्याच्या मार्गावर शेतकरी हाती काळे झेंडे घेऊन निदर्शने करीत होते. त्यावेळी काही गाड्यांनी निदर्शने करणार्‍या शेतकर्‍यांना चिरडले.

त्यात चार शेतकर्‍यांचा आणि नंतर उसळलेल्या हिंसाचारात इतर चौघांचा बळी गेला. शेतकर्‍यांवरून भरधाव वाहन चालवण्याचे दुष्कृत्य केंद्रीय मंत्रिपुत्राने केल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे, पण राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्र्यांच्या समर्थकांकडून तो नाकारला जात आहे.

माध्यमांतून त्याबाबत सचित्र बातम्या झळकल्यानंतर प्रकरण चांगलेच पेटले आहे. सर्व बाजूंनी दबाव वाढल्यानंतर संबंधित मंत्रिपुत्रावर सहा दिवसांनी गुन्हा करण्याचे कर्तव्य उत्तर प्रदेश पोलिसांनी पार पाडले. मंत्रिपुत्राचे पोलिसांनी भरपूर आदरतिथ्य केले. त्याआधी दोन विनम्र आवाहन पत्रे मंत्र्यांच्या घराच्या दारावर चिकटवण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) याप्रकरणी राज्य सरकारला फटकारले म्हणून तेथील पोलीस यंत्रणा हलली. अटकेनंतर मंत्रिपुत्राची रवानगी आता तुरुंगात झाली आहे. बापच केंद्रीय गृहराज्यमंत्री असल्यावर घाबरायचे कशाला? व कोणाला? असा विचार करून मंत्रिपुत्राने रावणवृत्तीचे दर्शन ‘रामराज्या’ला घडवले असावे का? शेतकरी आंदोलन सुरू काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी चांगल्याच सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे.

शेतकरी कायद्यांविरोधात त्यांनी उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांच्या महापंचायती घेतल्या. शेतकऱ्यांची बाजू आक्रमकपणे लावून धरली. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही त्यांना दिली. लखीमपूर खेरीतील घटना घडल्यानंतर प्रियांका गांधी त्याच रात्री मृत शेतकर्‍यांच्या नातलगांना भेटण्यासाठी व त्यांच्या सांत्वनासाठी तातडीने उत्तर प्रदेशकडे रवाना झाल्या.

त्या लखनौत पोहोचल्यावर स्वागतासाठी त्यांच्या तेथील घरापुढे शेकडो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. लगोलग त्या लखीमपूरकडे निघाल्या. मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. ताब्यात घेऊन सीतापूरच्या अतिथीगृहात डांबले. त्यां 36 तास नजरकैदेत ठेवण्याची मर्दमुकी उत्तर प्रदेश सरकारने गाजवली. नंतर त्यांना अटकही करण्यात आली. अटक झाली तरीही प्रियांका डगमगल्या नाहीत.

त्यांनी पोलिसांना खडसावले. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर राज्य सरकार आणि उत्तर प्रदेश पोलीसही वरमले. त्यानंतर मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी प्रियांका यांना परवानगी देण्यात आली. खासदार राहुल गांधीसह इतर नेतेसुद्धा लखीमपूरला निघाले. छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना तर विमानतळावरच रोखण्यात आल्याने त्यांनी तेथेच काही तास बसकण मारली होती.

प्रियांका यांनी पंतप्रधानांनादेखील लखीमपूर प्रकरणात लक्ष घालण्याचे जाहीर आवाहन केले. ‘लखीमपूरच्या शेतकर्‍यांची स्थिती समजून घ्या, त्यांचे सांत्वन करणे व सगळ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हा तुमचा धर्म आहे’ असे त्या म्हणाल्या. प्रियांका यांनी दाखवलेल्या हिंमतीला राहुल गांधी यांनी मनापासून दाद दिली. त्यांचे मनोबल वाढवले. पोलिसांनी जिला ताब्यात ठेवले आहे ती घाबरत नाही.

ती सच्ची काँग्रेसी आहे. ती कधी हार मानणार नाही. प्रियांका मागे हटणार नाही हे मला ठाऊक आहे. तिची हिंम्मत पाहून सरकार घाबरले आहे’ असे परखड ट्विट राहुल यांनी केले. न्यायाच्या अहिंसक लढाईत आम्ही देशाच्या अन्नदात्याला जिंकून देऊ, असेही त्यांनी ठासून सांगितले.

सीतापूरच्या अतिथीगृहात नजरकैदेत ठेवण्यात आल्यावर तेथेही सरकारला मूकपणे सुनावण्याची संधी प्रियांका यांनी साधली. त्यावेळी देशभर गांधी सप्ताह सुरू असताना त्यांनी झाडू हाती घेऊन अतिथीगृहाची साफसफाई केली. स्वच्छता अभियान सुरू करणार्‍यांना त्या संकल्पाचे अप्रत्यक्षपणे त्यांनी स्मरणच करून दिले.

पोलिसांना सुनावतानाचा त्यांचा जोश पाहून सारेच आवाक झाले. प्रियांका यांची आक्रमकता झुंजारबाणा पाहून काही नेत्यांना त्यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची झलक दिसली.
पुढील वर्षी म्हणजे येत्या काही महिन्यांत अनेक राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशचाही त्यात समावेश आहे. वैराग्यमूर्ती योग्याच्या नेतृत्वात भाजप सध्या तेथे बहुमतात राज्य करीत आहे. उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आणण्याची स्वप्ने जनतेला दाखवण्यात आली.

‘सबका साथ, सबका विकास’ करण्याची ग्वाहीही दिली गेली, पण गेल्या दीड-दोन वर्षांत उत्तर प्रदेशात वरचेवर घडणार्‍या हिंसाचार आणि अत्याचाराच्या घटनांनी ती स्वप्ने आणि आश्‍वासने निष्प्रभ केली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लखीमपूर घटनेनिमित्ताने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपला खरी-खोटी सुनावण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली आहे. गेल्या वर्षी हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती.

आता शेतकर्‍यांना चिरडण्याची घटना घडली आहे. राज्य सरकारची प्रतिमा डागाळण्यास ही घटना साह्यभूत ठरण्याची शक्यता आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर लखीमपूर घटनेने मोठे प्रश्‍नचिन्ह लावले आहे. लोकसभा निवडणुकीआधी भाजपला उत्तर प्रदेशात रोखण्याचा मानस अनेक विरोधी पक्षांनी व्यक्त केला आहे. एकजुटीचा नारा देऊन तसे प्रयत्नही काही विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्या प्रयत्नांना उत्तर प्रदेश निवडणुकीआधी यश येईल का? ते मात्र आताच कोणीच सांगू शकणार नाही.

सध्या तरी स्वबळावर लढण्याच्या इराद्यानेच प्रत्येक पक्ष प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न राज्याराज्यांतील विरोधी पक्षनेत्यांनी चालवले आहेत. त्या प्रयत्नांत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, खासदार राहुल गांधी आदी नेतेमंडळी सक्रिय झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीतील तृणमूल काँग्रेसची विजयी हॅटट्रिक आणि भवानीपूर पोटनिवडणुकीतील आताच्या दमदार विजयानंतर ममता बॅनर्जी यांचा आत्मविश्‍वास दुणावल्याचे स्पष्ट होत आहे. पोटनिवडणूक 60 हजारांच्या फरकाने जिंकून मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांनी मजबूत केली आहे.

राज्यसत्तेवरची पकड मजबूत केल्यानंतर आता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्याचा पवित्रा त्यांनी घेतला असावा, असा तर्क जाणते व्यक्त करीत आहेत. विधानसभा निवडणुकीत जंगजंग पछाडणार्‍या भाजपला धडा शिकवण्यासाठी ममता बॅनर्जी काहीही करू शकतात. तिसर्‍यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर पंतप्रधानांची औपचारिक भेट घेण्याच्या निमित्ताने दोन महिन्यांपूर्वी त्यांनी दिल्ली दौरा केला.

निमित्त पंतप्रधान भेटीचे असले तरी प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटी घेणे हाच त्यांच्या दिल्ली दौर्‍याचा प्रमुख उद्देश असावा, असेही बोलले जाते. दिल्लीतील माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांना एकजूटीचे आवाहन केले होते. आता तर तृणमूल काँग्रेसला पश्‍चिम बंगालपुरते मर्यादित न ठेवता त्याचा विस्तार करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांचा पक्ष करीत आहे. यशवंत सिन्हा यांच्या रुपाने बिहारमध्ये त्यांनी पक्ष सक्रिय केला आहेच. गोव्यातसुद्धा शिरकाव करण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. एकूणच ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे, असे म्हटले जात आहे. ‘एका पायावर बंगाल जिंकेन आणि दोन पायांवर दिल्ली!’ ही विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी केलेली घोषणा नुसती घोषणा नव्हती तर त्यांचा तो निर्धार होता हे आता स्पष्ट होत आहे. काँग्रेस हा सर्वात जुना-जाणता पक्ष आहे.

विरोधकांच्या एकजुटीचा नारा देतानाच भाजपविरोधात सक्षम पर्याय म्हणून तृणमूल काँग्रेसला पुढे आणण्याचा आणि काँग्रेसला मागे रेटण्याचा ममता बॅनर्जी यांचा इरादा असेल का? सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसशिवाय विरोधकांच्या आघाडीला अर्थ नाही, असे विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी बोलून दाखवले आहे. आपल्याशिवाय विरोधकांची आघाडी मजबूत होऊ शकत नाही याची काँग्रेस नेतृत्वाला पुरेपूर जाणीव आहे.

त्यामुळे महत्त्वाकांक्षी ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना छेद देण्यासाठी प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उतरवण्याची खेळी काँग्रेसकडून होत आहे का? उत्तर प्रदेशात काँग्रेसची ताकद क्षीण झाली आहे. ती ताकद वाढवण्याच्या निमित्ताने प्रियांका यांना पुढे आणण्याचा व विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याचा विचार काँग्रेसमधून पुढे आला असण्याची शक्यता असेल का? निमित्त उत्तर प्रदेशचे असले तरी काँग्रेसचे खरे लक्ष्य 2024 ची लोकसभा निवडणूक आहे, असे दिसते.

कधीकाळी काँग्रेसचा भाग असणार्‍या ममता बॅनर्जी काँग्रेसची जागा घेऊ पाहत आहेत. त्यांना रोखण्यासाठी प्रियांका यांच्या रुपाने सक्षम चेहरा काँग्रेस नेतृत्व पुढे आणू पाहत आहे. लडखडणाऱ्या काँग्रेससाठी प्रियांका गांधी ‘आशेचा नवा किरण’ ठरतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या