Tuesday, May 5, 2026
HomeराजकीयSunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत वेगवान घडामोडीत, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या पदाची धुरा आता सुनेत्रा पवार सांभाळणार असून, आज संध्याकाळी ५ वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. या ऐतिहासिक सोहळ्यापूर्वी त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

आज दुपारी २ वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीच्या सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शोकप्रस्ताव मांडून दिवंगत नेते अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पुढील नेतृत्वाबाबत चर्चा करण्यात आली. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव विधीमंडळ नेतेपदासाठी मांडला, ज्याला छगन भुजबळ यांनी तात्काळ अनुमोदन दिले. पक्षाच्या सर्व आमदारांनी या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिल्याने सुनेत्रा पवार यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली.

राज्याच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून सामील होण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करत सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते. मात्र, आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होत असताना त्यांनी खासदारकी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र घेऊन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पक्षाचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या पत्रानंतर राज्यपालांच्या संमतीने आज संध्याकाळी राजभवनावर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडेल. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागत असल्याने या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी जे व्हिजन ठेवले होते, तोच वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेतील, असा विश्वास पक्षातील नेत्यांनी व्यक्त केला आहे. कौटुंबिक दुखातून सावरत पक्षाची आणि राज्याची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधीमंडळ पक्षाच्या आजच्या बैठकीत सर्व आमदारांची उपस्थिती ही पक्षाची एकजुट दर्शवणारी ठरली आहे.

ताज्या बातम्या

Shrirampur : ‘ते घड्याळ’ पंधरा दिवसात फिरणार

0
श्रीरामपूर|प्रतिनिधी| Shrirampur शहरातील नेहरु भाजी मार्केट येथील टॉवरवरील घड्याळ दुरुस्तीसाठी भाजपचे संजय छल्लारे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन...