Monday, August 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल...

सुनिल गव्हाणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती

दिंडोरी | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी गेल्या सहा वर्षांपासून यशस्वीपणे सांभाळणारे सुनिल विजय गव्हाणे यांची आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.

विद्यार्थी चळवळीतून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात करणाऱ्या सुनिल गव्हाणे यांनी गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची संघटनात्मक बांधणी करण्यावर भर दिला. विद्यार्थी शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, शिक्षणातील विविध प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी विविध आंदोलने, निवेदने आणि जनजागृतीच्या माध्यमातून भूमिका मांडली.

कोविडच्या कठीण काळात विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या प्रश्नांसाठी ‘कोविड विद्यार्थी-पालक अभियान’ राबवून सामाजिक संवेदनशीलतेची भूमिका त्यांनी मांडली. तसेच विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले.

विद्यार्थी संघटनेपासून व्यापक पक्ष संघटनेपर्यंत
सहा वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राच्या विविध भागांत प्रवास करत असताना गव्हाणे यांनी विद्यार्थी प्रश्नांसोबतच राज्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय परिस्थितीचा जवळून अभ्यास केला. या काळात हजारो विद्यार्थी, युवक आणि कार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क निर्माण झाला.

त्यांच्या या संघटनात्मक अनुभवाची आणि पक्षासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत आता पक्षाने त्यांच्यावर फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयक म्हणून अधिक व्यापक जबाबदारी सोपवली आहे.

या माध्यमातून पक्षाच्या विविध फ्रंटल संघटना आणि सेल यांच्यात समन्वय साधणे, त्यांचे संघटनात्मक काम अधिक प्रभावी करणे, विविध विभागांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद ठेवणे तसेच पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी काम करणे, अशी महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

“सहा वर्षांच्या अनुभवाचा उपयोग आता व्यापक संघटनबांधणीसाठी करणार”

नवीन नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनिल गव्हाणे म्हणाले,

«“राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवून आज सहा वर्षे पूर्ण झाली. या सहा वर्षांत अनेक राजकीय चढ-उतार आले, मात्र पक्षाच्या विचारांप्रती आणि संघटनेप्रती माझी निष्ठा कधीही ढळू दिली नाही. या काळात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभले. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला घडवत महाराष्ट्र समजून घेण्याची आणि संघटनात्मक काम करण्याची संधी दिली.”»

“आज पक्षाने माझ्यावर फ्रंटल व सर्व सेल प्रदेश समन्वयक म्हणून नवीन जबाबदारी सोपवली आहे. हा माझ्यासाठी सन्मान नसून आणखी मोठी जबाबदारी आहे. गेल्या सहा वर्षांत विद्यार्थी संघटनेत काम करताना मिळालेला अनुभव आणि महाराष्ट्रभर निर्माण झालेले कार्यकर्त्यांचे नेटवर्क याचा उपयोग पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी करेन. आगामी काळात अधिक आक्रमकपणे आणि निष्ठेने काम करत पक्षाची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहीन,” असे गव्हाणे यांनी सांगितले.

“जबाबदारी बदलली; संघर्षाची दिशा तीच!”

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपासून सुरू झालेला सुनिल गव्हाणे यांचा संघटनात्मक प्रवास आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. विद्यार्थी चळवळीतील सहा वर्षांचा अनुभव, महाराष्ट्रभर केलेला दौरा आणि कार्यकर्त्यांशी निर्माण झालेले नाते यामुळे नवीन जबाबदारीतही ते पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

विद्यार्थी चळवळीपासून पक्षाच्या व्यापक संघटनात्मक जबाबदारीपर्यंतचा हा प्रवास सुनिल गव्हाणे यांच्या राजकीय वाटचातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...