पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सुपा परिसरासह पारनेर तालुक्याच्या काही भागात मंगळवारी जोरदार आवकाळी पाऊस झाला असून अनेक ठिकाणी ओढे नाल्यांमधून पुन्हा खळखळून पाणी वाहिले. या पावसामुळे अनेक ठिकाणी काढून साठवून ठेवलेला कांदा पाण्याखाली गेला असून शेतकर्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पारनेर तालुक्यात मोसमी पूर्व पाऊस पडत असून, यामुळे तालुक्यातील अनेक गावातील ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. दरम्यान, लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. मंगळवारी पारनेर तालुक्यातील बहुतांशी भागात वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी ओढे, नाले वाहते झाले आहे. या पावसामुळे कडक ऊन्हाळ्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे शेतकर्यांचे आता नुकसान होतांना दिसत आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपासून तालुक्यातील अनेक गावात वातावरणात दमटपणा होता. त्यानंतर दुपारी एकनंतर आकाश दाटून आले व पावसाना सुरूवात झाली. यावेळी सोसायाट्याचा वाराही सुटला होता. साधारणपणे एक तासानंतर पावसाचा वेग कमी झाला. मात्र, अनेक ठिकाणी भूरभूर्र पाऊस पडत होता.
गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे ऐन उन्हाच्या शेवटच्या टप्प्यात शेतात पाणी साठले असून यामुळे शेतीसोबत पिकांचे नुकसान होतांना दिसत आहे. काल झालेल्या वादळी पावसाने कांदा व आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या कांदा काढणी सुरू असल्याने शेतकर्यांच्या शेतात उघड्यावर कांदा पडलेला आहे, तर काही ठिकाणी कांदा साठणुकीचे काम सुरू आहे. यावेळी अचानक पाऊस पडत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होतांना दिसत आहे. पावसाचे प्रमाण असे राहिल्यास यंदा पारनेर तालुक्यात कडधान्य पिकांच्या पेरण्या लवकर होण्याची शक्यता आहे.
पारनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसचा तडखा सुरू असून या उन्हाळी पिकांसोबत भाजीपाला, कांदा आणि फळपिकांचे नुकसान होतांना दिसत आहे. काही प्रमाणात पडणारा पाऊस हा खरीप हंगामासाठी पोषक असला तरी सध्याच्या पावसामुळे शेतकर्यांची एकच धावपळ उडाली आहे. तालुक्यात नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पिकांची तातडीने पंचानामे करून भरपाईची मागणी होतांना दिसत आहे.