Friday, May 3, 2024
Homeनगरसुपरवायझरच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

सुपरवायझरच्या खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एमआयडीसीतील क्रॉम्प्टन कंपनीत कामावर नेमण्याच्या वादातून सुपरवायझर राजाभाऊ नामदेव वाघमारे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी किरण लोमटे (वय 34 रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, हल्ली रा. बोल्हेगाव फाटा, नगर) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. आर. नाईकवाडे यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी काम पाहिले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी केला.

- Advertisement -

23 जानेवारी 2020 रोजी सकाळी क्रॉम्प्टन कंपनीत ड्यूटी लावण्याच्या कारणावरून सुपरवायझर राजाभाऊ वाघमारे व किरण लोमटे यांचे वाद झाले होते. त्यावेळी किरण याने राजाभाऊ यांना ‘तुला बघून घेईल’, अशी धमकी दिली होती व कंपनीमधून बहिणीच्या घरी निघून गेला होता. बहिणीच्या घरून कोयता घेऊन आला व त्या कोयत्याला बोल्हेगाव येथील प्रकाश कुंडलीक पाटेकर यांच्या गजानन फॅब्रिकेशन व रोलींग शेटर्समधून धार लावून घेतली व कोयता पिशवीत घालून कंपनीकडे आला होता. सकाळी 11.30 वाजणेच्या सुमारास कंपनीच्या सिक्युरीटी कॅबीनमध्ये अनिल छबुराव उमाप व सुपरवायझर वाघमारे असे दोघे हजर होते. त्यावेळी किरण लोमटे तेथे आला. त्याच्या हातात एक पिशवी होती त्यातून त्याने कोयता बाहेर काढला व अचानक खुर्चीवर बसलेले वाघमारे यांच्या मानेवर व डोक्यावर जोराचा वार करून त्यांचा खून केला.

सदर प्रकार पाहून उमाप हे घाबरून गेले व कॅबिनच्या बाहेर येऊन थांबले. किरण याने त्यांच्यावरही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केला. त्यानंतर किरण कंपनीच्या गेटमधून बाहेर निघून गेला व हातातील कोयता कंपनीच्या बाहेर गवतात फेकून दिला. घटनास्थळी कंपनीचे इतर लोक जमा झाले व एमआयडीसी पोलीसही घटनास्थळी आले. अनिल छबुराव उमाप यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून किरण रामभाऊ लोमटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपअधीक्षक पाटील यांनी करून न्यायालयात आरोपी किरण लोमटे विरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

सदर खटल्यात सरकार पक्षातफे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल छबुराव उमाप, प्रत्यक्षदशी साक्षीदार सोपानराव नामदेव भोर, पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी, सीसीटीव्ही फुटेज विश्लेषक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेला कागदोपत्री पुरावा, तोंडी पुरावा व सरकार पक्षाचा युक्तिवाद तसेच सरकार पक्षातर्फे दाखल करण्यात आलेले सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्याय निवाडे ग्राह्य धरून आरोपी किरण रामभाऊ लोमटे यास जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी पोलीस अंमलदार अण्णासाहेब चव्हाण, सानप यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या