Monday, November 23, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! राजकीय पक्षांतराला चाप बसणार? केंद्र, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला...

मोठी बातमी! राजकीय पक्षांतराला चाप बसणार? केंद्र, निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली | New Delhi
राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणाऱ्या आणि अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी राजीनाम्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या आमदार-खासदारांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.

सोमवारी (२३ नोव्हेंबर) सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने केंद्र सरकार, भारतीय निवडणूक आयोग आणि विधी आयोगाला नोटीस बजावली. याशिवाय केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालय आणि संसदीय कामकाज मंत्रालयाकडूनही उत्तर मागवण्यात आले आहे. अपात्रतेची कारवाई सुरू होण्याची शक्यता असताना लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, तरी त्यांच्याविरोधातील अपात्रता याचिका आपोआप रद्द होऊ नये, अशी महत्त्वाची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात पक्षांतर आणि राजीनाम्यांच्या राजकारणावर कायदेशीर मर्यादा येणार का, याकडे देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे पुन्हा मैदानात; महाराष्ट्र दौरा करणार, ‘या’ तारखेपासून राज्यव्यापी दौऱ्याला सुरवात

नेमके काय आहे सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण?
पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्यासाठी ए. सेथू यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यांच्यावतीने आर. सतीश कुमार आणि जतीन या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली. या याचिकेत लोकप्रतिनिधींकडून राजीनाम्याच्या माध्यमातून पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी चुकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. काही आमदार किंवा खासदारांविरोधात पक्षांतरामुळे अपात्रतेची कारवाई सुरू होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर ते सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतात. त्यानंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश करून राजकीय समीकरणे बदलण्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतुदी आणि पारदर्शक प्रक्रिया असावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार लोकप्रतिनिधींच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची महत्त्वाची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष किंवा संबंधित सभागृहाच्या सभापतींकडे असते.मात्र, अशा प्रकरणांचा निर्णय घेण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर येतात. त्यामुळे अध्यक्षकेंद्री अपात्रता निर्णय प्रक्रियेचा संस्थात्मक आढावा घेण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत, पारदर्शक पद्धतीने आणि कारणांसह निर्णय घेतला जावा, यासाठी प्रभावी यंत्रणा निर्माण करण्याची गरज याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या