मुंबई | Mumbai
रक्षाबंधनाचा सण (Rakshabandhan) आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे प्रतीक मानला जातो. याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule Emotional Post) यांनी त्यांचे दिवंगत बंधू अजित पवार (Late Ajit Pawar) यांच्या आठवणीत अत्यंत भावूक पोस्ट केली आहे. अजित पवार यांच्या निधनाला सात महिने पूर्ण झाल्यानंतर आलेली ही पहिली राखीपौर्णिमा असल्याने सुळे यांनी दिवंगत अजित पवारांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
‘यावेळी तू सोबत नाहीस…’
आज राखीपौर्णिमा…पण यावेळी तू सोबत नाहीस, ही जाणीव मनाला खूप अस्वस्थ करत आहे. सात महिन्यांपूर्वीची ती भीषण सकाळ आणि तुझं अचानक निघून जाणं…यावर आजही विश्वास बसत नाही, अशी भावूक प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. लहानपणापासून एकत्र वाढताना आपली भांडणं, एकमेकांवरचं प्रेम आणि एकमेकांविषयीचा अभिमान हाच आपल्या नात्याचा पाया होता. आजही वाटतं, तू कुठूनतरी अचानक येशील, राखी बांधून घेशील, बहिणींसोबत गप्पागोष्टी करत पुन्हा कुटुंबात रमून जाशील…तुझ्या नसण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणारी नाही. तू जिथे असशील, तिथून तुझं प्रेम आणि आशीर्वाद असेच सदैव पाठीशी राहू दे…असं सुप्रिया सुळे सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाल्या.
अजित पवारांचे जानेवारीत विमान अपघातात निधन
अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीकडे जात असताना विमान अपघातात निधन झाले होते. या दुर्घटनेत विमानातील पायलटसह इतरांचाही मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर यंदाची राखीपौर्णिमा सुप्रिया सुळे यांच्यासाठी विशेष भावनिक ठरली आहे.सुळे यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही अनेकांनी प्रतिक्रिया देत अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भावंडांच्या नात्याच्या आठवणींना उजाळा दिला.




