नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचा दावा करत त्यांनी अनेक पुरावे सादर केले आहेत. याप्रकरणी त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडली आहे. त्यांनी या पत्रकार परिषदेत अपघाताबाबत संशय व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आलेय. त्यांनी शब्द दिला आहे की याची सविस्तर चौकशी करतील. रोहितची अस्वस्थता साहजिक आहे. अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरे सापडत नाहीयत. काय झालं, कसं झालं, आपण वाचवू शकलो असतो का? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आहेत. त्याने ही त्याची अस्वस्थता मांडली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी सविस्तर चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिले आहे. त्या चौकशीची आपण वाट पाहूयात.”
याप्रकरणी पवार कुटुंबाकडून कोणतीही अधिकृत भूमिका घेतली जात नसल्यावरून आज विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमचे कुटुंब खूप अडचणीच्या काळातून जात आहोत. एकमेकांना आधार देत आम्ही पुढे जात आहोत.”
Sanjay Raut: जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो…, संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर जहरी टीका
मला जुने उणेधुणे काढायचे नाही
आज दादा नाही, त्यामुळे मला जुने उणेधुणे काढायचे नाही. तो माझा दादा होता. पण तो आज आपल्यात नाही. माझ्यात आणि त्याच्यात जी काही चर्चा झाली ती आमच्यात आहे. आज तो जिथे असेल तिथे तो आनंदी असेल”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही
‘आमच्या सगळ्या बहीण-भावांचं दादासोबत चांगलं नातं होतं. आमच्या बॅचमध्ये एवढ्या लहान वयात दादा ज्या पद्धतीने गेला हे दादाचं जाण्याचं वय नव्हतं. इतक्या वर्षात दादाला कधी थकलेला, आजारी बघितलं नाही. आज दादा आपल्यात नाही हे खरं वाटत नाही.’, असे म्हणत सुप्रिया सुळे भावुक झाल्या.
माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री झाल्या. अजितदादा गेल्यानंतर त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘मी आणि सुनेत्रा वहिनी याआधीही डीपीडीसीला एकत्र होतो. सुनेत्रा वहिनींवर ही नवीन जबाबदारी आहे. सुनेत्रा वहिनी पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे. पण अजितदादा नसल्याचे दु:खही आहे. सध्या माझ्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद आहे. अजितदादा नसण्याचे दु:ख कधीच भरून निघणार नाही. आजही आम्हाला खरं वाटत नाही की अजितदादा आपल्यात नाही.
शरद पवारांच्या तब्येतीची माहिती दिली
दरम्यान, शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राजनाथ सिंग, ओमर अब्दुलांसह अनेकांनी शरद पवारांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरता फोन केले होते. या सर्व काळात सर्वांनी पवार कुटुंबाला साथ दिली, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.





