नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिंहस्थासाठी द्वारका (Dwarka) येथे सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने शहराचा श्वास अक्षरशः गुदमरला आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा, उडणारी धूळ, बेशिस्त चालकांचे कर्णकर्कश हॉर्न आणि वाहनांच्या धुरामुळे तिहेरी प्रदूषणाची समस्या गंभीर बनली आहे. गर्दीमुळे वाहनधारकांसह वाहतूक पोलीस आणि वॉर्डनही हैराण झाले आहेत.
रस्ते खोदकामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून, काही बेशिस्त चालक अनावश्यक हॉर्नचा वापर करीत आहेत. धुलिकणांचा त्रास वाढल्याने वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी व वॉर्डन यांना मास्क वापरण्याची गरज भासत आहे. नियमित फेसमास्क किंवा पारदर्शक मास्कचा वापर केल्यास भविष्यातील श्वसनासंबंधी आजार टाळता येऊ शकतात, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांच्या आदेशान्वये वाहतूक उपायुक्त किरिथिका सी. एम. आणि सहाय्यक आयुक्त अद्विला शिंदे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. सध्या पाचपेक्षा अधिक रस्ते, दोन बोगदे व एका लहान पुलाचे काम सुरू असल्याने सात वाहतूक पथकांना अतिरिक्त बळ देण्यात आले आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फतः प्रस्तावित रिंगरोडमुळे भविष्यातील वाहतुकीला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र सध्याच्या स्थितीत नागरिकांना संयम राखून कोंडी व प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे.
अतिरिक्त पंचवीस अंमलदार नियुक्त
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २१ रस्ते, पाच पूल आणि नऊ रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी अतिरिक्त २५ अंमलदारांची वाहतूक शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यालय व इतर ठिकाणाहून कुमक नेमून विविध चौकांमध्ये जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्दे
- सध्या वाहतूक पोलिसांची सात पथके कार्यरत
- एक उपायुक्त, एक सहाय्यक आयुक्त, सहा वरिष्ठ निरीक्षक, एक उपनिरीक्षक नियुक्त
- ३५० अंमलदार कार्यरत; नोव्हेंबर २०२५ मध्ये १२० अतिरिक्त अंमलदारांची नियुक्ती
- एनएचएआय व महापालिकेचे काही ट्राफिक वॉर्डन कार्यरत
- फेब्रुवारीत १०० ट्राफिक वॉर्डन नियुक्त होणार
- सिंहस्थासाठी तीन हजार वॉर्डनची अपेक्षा, ३६५ वॉर्डन मंजूर
सिंहस्थाकरिता वाहतूक विभागणी
- मुख्य पथके: पंचवटी, सरकारवाडा, अंबड, नाशिकरोड
- अतिरिक्त पथके: सातपूर, द्वारका, एक्स्लो





