मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे सूरज चव्हाण यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सूरज चव्हाण यांना कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात १७ जानेवारी २०२४ रोजी अटक करण्यात आली होती. भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खिचडी घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यानंतर सूरज चव्हाण यांना अटक झाली होती.
मुंबई महापालिकेने कोरोनाच्या काळात गरीब, स्थलांतरीत नागरिकांना खिचडी पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. कंत्राटात निश्चित करण्यात आलेल्या वजनापेक्षा कमी खिचडी वाटप करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांना २ कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मलिदा मिळाल्याचे सांगण्यात आले होते. यातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररीत्या मिळवले. शिवाय, कराराचे उल्लंघन करत दुसर्या एजन्सीला उपकंत्राटही दिल्याचा आरोप होता.
सुरज चव्हाण हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात, तसेच ते युवासेनेचे पदाधिकारी आहेत. सूरज चव्हाण यांच्यासह ठाकरे गटाचे उपनेते अमोल किर्तीकर यांचीही चौकशी करण्यात आली होती. हायकोर्टाने सूरज चव्हाण यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. सूरज चव्हाण यांनी जामीनासाठी पीएमएलए कोर्ट आणि सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अखेर सूरज चव्हाण यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गून्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्हा आधारावर, ईडीने अटक केली होती. गेल्या १७ जानेवारी २०२४ पासून सूरज चव्हाण हे अटकेत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळातील या कथित खिचडी घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते.
काय आहे प्रकरण?
किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर, मुंबई पोलीस आणि इडीच्या तपासाने वेग घेतला होता. कोरोना काळात स्थलांतर करणाऱ्या गरीब कामगारांसाठी, ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळच्या सरकारने घेतला होता. केंद्र सरकारनेही त्याला पाठिंबा दिला होता. मुंबई महापालिकेने एकूण ५२ कंपन्यांना खिचडी देण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.
सूरज चव्हाण यांच्या खात्यात दीड कोटींहून अधिक रुपये दिले गेले. ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले गेल्याचा आरोप केला होता. ज्या तक्रारी दाखल झाल्या आहेत, त्या कंपन्यांमधून अमोल कीर्तिकर यांच्या खात्यात एक कोटी 65 लाख रुपये दिले. याशिवाय संजय राऊत यांचे भागिदार सुजित पाटकर यांचा राजीव साळुंके सह्याद्री बदलीवर आलेल्या सूरज चव्हाण यांच्या खात्यात एका कंपनीमधून एक कोटी वीस लाख रुपये गेले. ते पैसे कशासाठी? असा प्रश्न विचारला होता ? आम्ही खिचडी कशी बनवायची यासाठी सल्लागार नेमला आहे. किती तांदूळ, किती डाळ याची सल्लागाराचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून लाखो रुपये काढण्यात आल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा