शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका 29 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) पत्नी दिविशा शेट्टीसह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन (Sai Baba Samadhi Darshan) घेतले. दुपारच्या माध्यान्ह आरतीला उपस्थित राहून सूर्यकुमार यांनी साईबाबांच्या चरणी नमस्कार केला आणि आगामी मालिकेत यश मिळावे अशी प्रार्थना केली.
साईबाबा दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यांनी सांगितले, आज सहपरिवार साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. आरतीला उपस्थित राहता आल्याचा मला खूप आनंद झाला. साईबाबांचे आशीर्वाद घेतल्याने मनाला समाधान लाभले. येणार्या सामन्यांसाठी सर्व काही चांगले चालले आहे आणि सर्व उत्तम होईल, याची खात्री आहे. तसेच त्यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.
याप्रसंगी साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी सूर्यकुमार आणि त्यांच्या परिवाराचा सत्कार केला. प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे, प्रशांत सूर्यवंशी आणि अनिल धरम उपस्थित होते.सूर्यकुमार यादव हे साईबाबांचे निष्ठावान भक्त असून, आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी ते नेहमीच शिर्डीत (Shirdi) येऊन साईदर्शन (Sai Darshan) घेतात.
यावेळीही त्यांनी साईबाबांच्या समाधीवर केसरी शॉल अर्पण करून आशीर्वाद घेतला. आता सर्वांचे लक्ष 29 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या भारत-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेकडे लागले आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने भारतीय संघ उज्ज्वल कामगिरी करेल, अशी अपेक्षा साईभक्त आणि क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.




