Wednesday, May 20, 2026
Homeमुख्य बातम्याSushma Andhare : २०२३ मध्येच विधेयक मंजूर, मग आता खोटा कांगावा का?;...

Sushma Andhare : २०२३ मध्येच विधेयक मंजूर, मग आता खोटा कांगावा का?; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर घणाघात

मुंबई । Mumbai

राज्यातील राजकीय वातावरण सध्या महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पुराव्यासह चोख प्रत्युत्तर दिले. “सत्याची भ्रूणहत्या करण्यात देवेंद्र फडणवीस माहिर आहेत,” अशा कडक शब्दांत टीका करत अंधारे यांनी भाजप नेत्यांच्या जुन्या ट्विट्सचा पंचनामाच सादर केला.

- Advertisement -

सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये केलेली ट्विट्स पत्रकारांना दाखवली. अंधारे म्हणाल्या की, “२०२३ मध्ये अमित शहा यांनी स्वतः महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्याचे ट्विट करून जल्लोष केला होता. फडणवीसांनीही त्याला ‘ऐतिहासिक क्षण’ म्हटले होते. जर विधेयक तेव्हाच मंजूर झाले होते, तर आता विरोधकांमुळे ते रखडले आहे, असे म्हणणे म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे.” पंतप्रधान नरेंद्र मोदींचे २०२३ मधील भाषण ऐकवत त्यांनी फडणवीसांच्या दाव्यांमधील फोलपणा उघड केला.

फडणवीसांनी वापरलेल्या ‘भ्रूणहत्या’ या शब्दाचा समाचार घेताना अंधारे यांनी इतिहासाचे दाखले दिले. त्या म्हणाल्या, “महिला आरक्षणाची पहिली भ्रूणहत्या १९५१ मध्ये झाली होती, जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विधेयक मांडत होते. त्यावेळी त्याला कडाडून विरोध करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी आणि मदन मोहन मालवीय हे कोणत्या विचारधारेचे होते, हे फडणवीसांनी सांगावे. महिलांच्या हक्कासाठी डॉ. आंबेडकरांनी मंत्रीपदाचा त्याग केला होता, फडणवीस महिला आरक्षणासाठी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का?”

सुषमा अंधारे यांनी फडणवीसांना एक वैचारिक आव्हान दिले आहे. “महात्मा फुले यांनी लिहिलेली ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ ही पुस्तके फडणवीसांनी आरएसएसच्या (RSS) वार्षिक कार्यक्रमात वाचून दाखवावीत. त्यावर सरसंघचालक मोहन भागवत यांची काय प्रतिक्रिया येते, हे त्यांनी एकदा जगाला जाहीर करावे,” असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘सरडा’ म्हणणे त्यांच्या पदाला शोभत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे यांच्या विरोधात फडणवीसांनी वापरलेल्या भाषेवर अंधारे यांनी संताप व्यक्त केला. “सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याशी चर्चेचा स्तर नाकारणे म्हणजे तुमचा ‘चांगदेवाचा अहंकार’ आहे. महिलांना तुच्छ लेखण्याची तुमची ही वृत्ती महाराष्ट्राला मान्य नाही,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी चित्रा वाघ यांचा उल्लेख ‘चित्र-विचित्र’ असा करत त्यांच्यावरही निशाणा साधला.

बातमीच्या शेवटी अंधारे यांनी थेट आव्हान दिले की, “देवेंद्र फडणवीस यांनी वेळ आणि ठिकाण ठरवावे, मी चर्चेला येण्यास तयार आहे. जर ते चर्चेला आले नाहीत, तर ते सत्याला घाबरतात असे स्पष्ट होईल. तसेच, २०२९ मध्ये सत्ता आल्यास देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री महिला असेल, अशी घोषणा करण्याची हिंमत भाजप दाखवेल का?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादी

NCP Meeting: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण होणार? पक्षाच्या बैठकीत घेतला...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाची आज (दि.२०) मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी थेट प्रश्न...