मुंबई | Mumbai
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर त्याच्या राहत्या घरी चोरीच्या उद्देशाने एका संशयिताने (Suspect) जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्या पाठीवर चोराने वार केल्याने त्याला तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. यानंतर पोलिसांनी संशयिताच्या तपासासाठी पोलिसांची पथके महाराष्ट्रासह परराज्यात रवाना केली होती. त्यानंतर आता पोलिसांना या प्रकरणात मोठे यश आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी (Police) आकाश कन्नौजिया नावाच्या एका संशयिताला छत्तीसगढमधील दुर्ग येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीचा फोटो मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) देण्यात आला होता त्यातील व्यक्ती आणि रेल्वे स्टेशनवरून पकडण्यात आलेल्या आरोपीचा चेहरा मिळताजुळता आहे. त्यामुळे सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा हाच मुख्य आरोपी असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याबाबत माहिती देतांना डीजी मनोज यादव म्हणाले की, “मुंबई पोलिस या संशयिताचे लोकेशन ट्रॅक करत होती. त्यांना माहिती मिळाली की हा इसम ट्रेनमध्ये असून ही ट्रेन दुर्ग आणि राजनंद गावाच्या आजूबाजूला आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही माहिती छत्तीसगढ पोलिसांना दिली, असे त्यांनी सांगितले. यानंतर आता मुंबई पोलीस या आरोपीची ओळख पटवण्यासाठी दुर्ग (Durg) येथे आज रात्रीच जाण्याची शक्यता आहे.