नाशिक | प्रतिनिधी Nashik
निफाड तालुक्यातील भाऊसाहेबनगर-पिंपळस येथील निफाड सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया जिल्हा सहकारी बँकेने सुरू केले आहे. या प्रक्रियेला स्थगिती मिळावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती राजेंद्र मोगल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
राजेंद्र मोगल, दिलीप मोरे, तानाजी पूरकर, विलास मत्सागर, दिनकर मत्सागर, खंडेराव बोडके, विजय रसाळ, शाम जाधव यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे. जिल्ह्यातील नावाजलेला आणि एकेकाळी सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला ३५,००० सभासद आणि १,२०० कामगार असलेला निफाड साखर कारखाना थकित कर्जामुळे जिल्हा सहकारी बँकेने २९-०८-२०१६ ला ताब्यात घेतला. २९-१०-२०२२ ला गळित हंगाम २०२३-२४ पासून २५ वर्षांसाठी बांधकाम व्यावसायिक मे. बी. टी. कडलग यांना सुपूर्द करण्यात आला. सहकार क्षेत्र व कारखानदारीचा कोणताही अनुभव नसताना राजकीय दबावापोटी बँकेच्या काही स्वार्थी अधिकार्यांच्या फायद्यासाठी शासनाचे नियम डावलून हा कारखाना संबंधित कंपनीला चालवण्यास दिला गेला, असे पत्रात म्हटले आहे.
निफाड साखर कारखान्याकडे अतिरिक्त जमीन भरपूर असल्याने केंद्र सरकारच्या ड्रायपोर्ट प्रकल्पासाठी त्यातील १०८ एकर जमिनीची विक्री केली गेली. या व्यवहारापोटी ड्रायपोर्टने १०८ कोटी रुपये बँकेला अदा केले. बँकेच्या कर्जापोटी १३९ कोटी रुपये देणे असताना या रकमेतून सेल्स टॅक्स ३२ कोटी रुपये जमा करून उर्वरित रक्कम कर्ज भरण्यासाठी ड्रायपोर्टने जिल्हा बँकेला दिली. कारखाना पुन्हा उर्जितावस्थेत आणून पूर्ववत सुरू व्हावा व बँकेचे कर्ज कमी व्हावे, या हेतूने कारखान्याची जमीन ड्रायपोर्टसाठी विकण्यात आली. कारखाना सुरू करण्यासाठी संलग्न बायोगॅस, लगुन्स, इटीपी, प्रेसमड यार्ड आदी प्रकल्पांची आवश्यकता असते. प्रदूषण मंडळाच्या परवानगीशिवाय कारखाना चालू करता येत नाही. ही बाब बँक प्रशासन व संबंधित कंपनीस माहीत असतानाही बँकेच्या काही स्वार्थी अधिकार्यांनी हेतुपुरस्सर हे प्रकल्प डावलून करार केला. ड्रायपोर्टला देण्यात येणार्या क्षेत्रात हे प्रकल्प आहेत याची माहिती असूनही ही प्रक्रिया राबवली गेली. बँकेचे काही अधिकारी आणि मे. बी.टी. कडलग कंपनीने संगनमताने हा वाद निर्माण करून शासन आणि कारखान्याची फसवणूक केली आहे, असे मोगल यांनी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
निफाड साखर कारखाना विक्री प्रक्रियेमुळे निफाड तालुक्यात कारखाना सभासद आणि कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यातून मोठे जनआंदोलन उभे राहून त्याचा कधीही उद्रेक होऊ शकतो. याप्रकरणी आपण स्वत: लक्ष पुरवून निफाड कारखाना विक्री प्रक्रियेस स्थगिती द्यावी व कारखाना सुरू करण्याबाबत बँक प्रशासनाला योग्य त्या सूचना कराव्यात, अशी मागणी राजेंद्र मोगल यांनी पत्रात केली आहे. मंत्री छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे तसेच जिल्हाधिकारी यांनाही याबाबत पत्र पाठवण्यात आले आहे.




