Monday, May 11, 2026
Homeदेश विदेशमुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, धक्कादायक माहिती उघड

मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक, धक्कादायक माहिती उघड

कोलकाता । Kolkata

पश्चिम बंगालमधील सत्तांतराच्या रणधुमाळीनंतर राजकारण तापलेले असतानाच, नवनिर्वाचित मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण देश हादरला होता. मात्र, अत्यंत सराईतपणे रचलेला हा हत्येचा कट उघड करण्यात बंगाल पोलिसांना मोठे यश आले आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून पसार होणाऱ्या मारेकऱ्यांना एका ‘डिजिटल ट्रॅपने’ जेरबंद केले आहे. रोख रकमेऐवजी केलेल्या एका ‘यूपीआय’ (UPI) पेमेंटमुळे या हायप्रोफाईल हत्येचा छडा लागला असून बिहार आणि उत्तर प्रदेशमधून तिघांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये गेल्या १५ वर्षांपासून असलेली ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली आणि ४ मे रोजी लागलेल्या निकालात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. या ऐतिहासिक विजयानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर ६ मे रोजी रात्री उशिरा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय चंद्रनाथ रथ यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमुळे नवनिर्वाचित सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

चंद्रनाथ रथ यांची हत्या केल्यानंतर मारेकरी चंदेरी रंगाच्या हॅचबॅक कारमधून पळून गेले होते. त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी गाडीवर बनावट नंबर प्लेट लावली होती. मात्र, पळून जात असताना हावडा जिल्ह्यातील ‘बाली टोल प्लाझा’ येथे त्यांनी एक मोठी चूक केली. टोल भरताना त्यांच्याकडे रोख रक्कम नव्हती किंवा ओळख लपवण्यासाठी त्यांनी घाईघाईत ‘यूपीआय’द्वारे डिजिटल पेमेंट केले. हेच डिजिटल ट्रॅन्झॅक्शन पोलिसांसाठी सर्वात मोठा पुरावा ठरले. या पेमेंटमुळे पोलिसांना एका मोबाईल नंबरचा सुगावा लागला. विशेष पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि टोल नाक्यावरील हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपींचे चेहरे आणि गुन्ह्यात वापरलेली कार स्पष्टपणे टिपली गेली होती.

मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे बंगाल सीआयडी आणि पोलीस पथकाने परराज्यात मोहिमा आखल्या. बिहारच्या बक्सरमधून मयंक राज मिश्रा आणि विकी मौर्य या दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर तिसरा आरोपी राज सिंग याला उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातून अटक करण्यात आली. या तिघांनाही रविवारी १० मे रोजी मध्यमग्राम पोलिसांनी अधिकृतपणे अटक केली. तपासात असे समोर आले आहे की, हे तिन्ही आरोपी ‘कॉन्ट्रॅक्ट किलर्स’ असून त्यांना खास या हत्येसाठी सुपारी देऊन परराज्यातून बोलावण्यात आले होते.

तपासादरम्यान आणखी काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी वापरलेली कार ही एक ‘क्लोन’ गाडी होती. सिलीगुडीमधील एका खऱ्या गाडीचा नंबर ऑनलाईन पोर्टलवरून चोरून तो या गुन्ह्यातील गाडीवर वापरण्यात आला होता. इतकेच नव्हे तर, या हत्येसाठी ऑस्ट्रिया बनावटीच्या अत्याधुनिक ‘ग्लॉक ४७ एक्स’ (Glock 47X) या पिस्तुलाचा वापर करण्यात आला होता. या परदेशी शस्त्राच्या वापरामुळे आता केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या असून, आंतरराज्यीय शस्त्र तस्करीचे धागेदोरे तपासले जात आहेत.

अटक केलेले तिन्ही तरुण केवळ मारेकरी आहेत, मात्र या हत्येचा खरा सूत्रधार कोण? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजकीय वैमनस्यातून ही सुपारी दिली गेली की यामागे काही व्यावसायिक कारण होते, याचा तपास सीआयडी करत आहे. या मारेकऱ्यांना स्थानिक पातळीवर कुणी मदत केली आणि त्यांना शस्त्रे कोणी पुरवली, याचे धागेदोरे लवकरच हाती लागतील, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Heat Wave News : जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’; ‘या’ कालावधीत उष्णतेच्या...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जिल्हा आणि घाट प्रक्षेत्रात येत्या ४८ तासांत सूर्याचा (SUN) पारा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने (Meteorological Department) उष्णतेच्या लाटेचा (Heat...