Sunday, October 25, 2026
Homeक्राईमShrigonda : तलवारीने जीवघेणा हल्ला करणार्‍या चार आरोपींना 7 वर्षे सक्तमजुरी

Shrigonda : तलवारीने जीवघेणा हल्ला करणार्‍या चार आरोपींना 7 वर्षे सक्तमजुरी

श्रीगोंदा सत्र न्यायालयाचा निकाल || मुख्य आरोपीला पुरावा नष्ट केल्याप्रकरणीही शिक्षा

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

शेतातील वेड्या बाभळीची झाडे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तलवारीने जीवघेणा हल्ला करणार्‍या चार आरोपींना श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवून प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील संतवाडी शिवारात 15 मे 2017 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणात मुख्य आरोपीला पुरावा नष्ट केल्याप्रकरणीही स्वतंत्र शिक्षा सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

या खटल्याची माहिती अशी की, फिर्यादी अंकुश बापुराव खोरे (वय 60, रा. काष्टी) हे 15 मे 2017 रोजी आपल्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने मशागत करून वेड्या बाभळीची झाडे काढत होते. यामुळे आपल्या पाइपचे नुकसान होईल, असे सांगत आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी संगनमताने फिर्यादी व साक्षीदारांना शिवीगाळ करून दमदाटी केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी आरोपी अशोक गोविंद पाचपुते याने पांडुरंग अंकुश खोरे यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. वार अडवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन फ्रॅक्चर झाले. घटनेनंतर गुन्ह्यात वापरलेली तलवार लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील के. जी. केसकर यांनी कामकाज पाहिले. न्यायालयीन कामकाजात कोर्ट ऑर्डली म्हणून पोलीस हवालदार एन. आय. नरुटे यांनी सहकार्य केले. न्यायालयाने आरोपी अशोक गोविंद पाचपुते, नानासाहेब राजाराम पाचपुते, दीपक अशोक पाचपुते आणि दत्ता गोविंद पाचपुते या चौघांना प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावास भोगावा लागणार आहे.

तसेच, चारही आरोपींना प्रत्येकी दोन वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास एक महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावासाची तरतूद आहे. मुख्य आरोपी अशोक पाचपुते याला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी स्वतंत्रपणे दोन वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास त्यालाही एक महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावास भोगावा लागणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत.

ताज्या बातम्या

Rahata : गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मिळणार रब्बी व उन्हाळी प्रत्येकी एक...

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata चालू वर्षी पर्जन्यमानामध्ये तब्बल 50 टक्क्यांपेक्षा जास्त तूट असल्याने भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठ्याचे...