सचिन दसपुते | अहिल्यानगर | Ahilyanagar
राज्यात गुटख्यावर बंदी असल्याचा सरकारी आव आणला जात असताना अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र गुटख्याचा काळा बाजार थेट पोलिसांच्या संरक्षणाखाली फोफावला आहे, असा खळबळजनक आरोप हिवाळी अधिवेशनात झाला. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात उभे राहून जे सांगितले, ते केवळ आरोप नाहीत तर पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर थेट घाव घालणारे वास्तव आहे.
पोलीस अंमलदार ‘चौधरी’ व ‘घोडके’ हे गुटखा माफियांचे ‘कलेक्शन एजंट’ बनले असून दरमहा सुमारे 90 लाख रूपयांची हप्ता वसूली केली जाते, असा आरोप आ. खताळ यांनी केला आहे. हा पैसा खालच्या स्तरावर थांबत नाही, तर ‘सिस्टीम’नुसार वरिष्ठांपर्यंत जातो. अनेकजण त्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळेच जिल्ह्यात कोणत्याही टपरीवर, कोणत्याही वेळी गुटखा सहज उपलब्ध आहे.
कर्नाटक राज्यातून सोलापूरमार्गे गुटखा अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल होतो. तपास यंत्रणांना चकवा देत नाही, तर पोलिसांच्या माहितीने आणि संमतीने ही वाहतूक सुरू असते, अशी जिल्ह्यातील चर्चा आहे. हिरा, गोवा, डायरेक्टर, विमल, राजनिवास यांसारख्या ब्रँडचा गुटखा जिल्ह्यात विकला जात आहे. नगर, संगमनेर, शेवगाव, राहाता आदी तालुक्याच्या ठिकाणी ठराविक डिलर नेमून संपूर्ण जिल्ह्याची ‘गुटखा सप्लाय चेन’ उभी करण्यात आली आहे. या साखळीमुळे महिन्याला कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत आहे.
नगर शहरात ‘नावेद’, शेवगावला ‘अल्ताफ’, संगमनेरला ‘रईस’, लोणी परिसरात ‘फिरोज’ हे गुटखा वितरणाचे प्रमुख दुवे म्हणून ओळखले जातात. यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक टपरीपर्यंत गुटखा पोहोचतो. या गुटख्याची तालुकानिहाय वितरण व्यवस्था (डिलर सिस्टीम) उभी करण्यात आली असून हे डिलर थेट पोलिसांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जिल्ह्यात गुटखा विक्रीवर कारवाई कायद्यानुसार नव्हे, तर हप्त्यानुसार होत असल्याचे वास्तव आता उघड झाले आहे. जो विक्रेता हप्ता भरतो, त्याच्यावर कारवाई होत नाही. जो नकार देतो, त्याच्यावर गुन्हे दाखल होतात, छापे टाकले जातात. त्यामुळे पोलीस ठाण्यांची भीती नाही, तर हप्ता बंद झाला तर कारवाई होईल, याचीच भीती विक्रेत्यांमध्ये आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरूवातीला अवैध धंद्यांवर जोरदार कारवाई केली. विशेष पथक स्थापन झाले, यांनी जिल्ह्यात गुटखा, मावा विक्रेत्यांवर कारवाई केली. काही काळ विक्रेत्यांची झोप उडाली. मात्र हे चित्र फार काळ टिकले नाही. पथक बरखास्त झाले आणि गुटखा विक्री पुन्हा पूर्ववत सुरू झाली. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात गुटखा सहज उपलब्ध होत आहे. संगमनेर, अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा खाली करून तो इतर ठिकाणी पाठविला जातो. कोट्यावधीचा मलिदा पोलिसांना मिळत असल्याचे त्यांची हिंमत वाढली आहे. अधिवेशनात थेट महिन्याला 90 लाखांच्या हप्ता वसूलीचा मुद्दा मांडला जात असताना, वरिष्ठ अधिकार्यांना याची कल्पना नाही, हे कोणालाही मान्य होणार नाही.
धमकी देण्यापर्यंत मजल
गुटखासंदर्भातील प्रश्न सभागृहात मांडल्यानंतर आ. खताळ यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची अप्रत्यक्ष धमकी देण्यात आल्याचा आरोप स्वतः आ. खताळ यांनी केला आहे. जर लोकप्रतिनिधीलाच असे धमकावले जात असेल, तर सामान्य नागरिक, सामाजिक कार्यकर्ते किंवा प्रामाणिक पोलीस अधिकारी यांची काय अवस्था होत असेल, याचा अंदाज लावणे कठीण नाही. एका पोलिसाकडून धमकी दिली गेल्याची बाब आ. खताळ यांनी सभागृहात मांडली. धमकी देण्यापर्यंत पोलिसाची मजल गेली, हा गुटख्यातून येणार्या पैशाचा माज आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
चौकशी की दिलासा ?
गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे. मात्र याआधीही अनेक प्रकरणांत चौकशीचे घोडे कागदावरच अडले आहेत. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की, खरोखर त्या पोलीस अंमलदारांवर कारवाई होणार का? की अधिवेशन संपल्यामुळे सगळे पुन्हा शांत होणार? जर वेळीच ठोस कारवाई झाली नाही, तर गुटखा माफिया अधिक बळावतील, हप्तेखोरी वाढेल आणि पोलीस खात्याच्या खाकी वर्दीची उरलेली विश्वासार्हताही संपुष्टात येईल, अशी तीव्र भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात कारवाई होणार का, की ‘सिस्टीम’ पुन्हा एकदा वरचढ ठरणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
‘सिस्टीम’पुढे अधिकारी हतबल
स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी किंवा उपविभागीय पोलीस अधिकार्यांची मोठ्या गुटखा वाहतूक किंवा मुख्य डिलरवर कारवाई करण्याची हिंमत होत नाही, अशी स्थिती आहे. एखाद्या अधिकार्याने धाडस केले तर त्याला ‘सिस्टीम’कडून टार्गेट केले जाते, अशी दबक्या आवाजातील चर्चा पोलीस दलात सुरू आहे. त्यामुळे गुटखा माफिया निर्भयपणे आपला काळा धंदा चालवत आहेत.




