Thursday, May 2, 2024
Homeनगरताहाराबादक्षेत्री भक्ती सागर उसळला; पाच लाख भाविकांनी घेतले दर्शन

ताहाराबादक्षेत्री भक्ती सागर उसळला; पाच लाख भाविकांनी घेतले दर्शन

ताहाराबाद |वार्ताहर| Taharabad

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रतीपंढरीत पांडुरंग सोहळ्याच्या अंतिम चरणात भाविकांचा जनसागर उसळला आहे. जिल्ह्यातून आलेल्या असंख्य दिंड्यांचा आज मंगळवारी परतीचा प्रवास होणार आहे. मोठ्या भक्तीभावाने वारकरी सालाबादप्रमाणे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा नयनरम्य सोहळा करून प्रस्थान ठेवणार आहेत.

- Advertisement -

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या पांडुरंग महोत्सवात राज्यभरातील सुमारे 500 पायी दिंडी सोहळ्यांनी सहभाग नोंदविला. तर पाच दिवसांत राज्यातील पाच लाखांहून अधिक भाविकांनी प्रतीपंढरीत हजेरी लावली. द्वादशीच्या पर्वणीत विविध पडावर भजन, भारुड, किर्तन व रात्री जागर आदींसह कार्यक्रम संपन्न झाले. महिलांनी गवळणी, पाळणे व फुगडी आदी कार्यक्रमांचा आनंद द्विगुणीत केला. हा स्वर्गीय सुख सोहळ्याचा सरत्या आषाढ सरींनाही मोह झाला.

आषाढ सरींची बरसात सुरू असतानाच भावभक्तींच्या धारांमध्ये वारकरी ओलेचिंब होऊन गेले होते. द्वादशीला एकनाथ महाराज चत्तर व मनोज महाराज सिनारे यांची कीर्तन सेवा झाली. दुपारच्या सत्रात महेश बिडवे व ऋषी बिडवे यांचाही भावगीतांचा कार्यक्रम झाला. सिनारे महाराजांनी महिपती महाराजांची महती सांगून भाविकांना मंत्रमुग्ध केले. तसेच संध्याकाळी समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांची कीर्तन सेवा झाली. राहुरी तालुक्यातील कीर्तनकार महिपतींचा प्रचार व प्रसार करतात, म्हणून तर सेवेमुळे मेवा मिळतो. महिपतींची सेवा करण्यातच आम्ही भाग्य समजतो, असे भावनिक उद्गाार सिनारे महाराजांनी काढले.

त्रयोदशीच्या काल्यासाठी असंख्य दिंड्यांचे आगमन प्रतीपंढरीत काल झाले. रथ, अश्व, पालख्या खांद्यावर भगव्या पताका धारण केलेले वारकरी व टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष यांनी प्रतीपंढरी दणाणून गेली.284 संतांचे चरित्र ज्या पावन भूमीत लिहिले गेले, ती संत कवी महिपती महाराजांची कर्मभूमी आणि भक्ती विजय ग्रंथाची जन्मभूमी गेल्या चार दिवसांपासून धन्य झाली आहे. त्याच पावनक्षेत्री आज काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा सोहळा संपन्न होणार आहे. दहीहंडीची लाही घेऊन वारकरी परतीच्या प्रवासाला लागतो. मनामध्ये महिपतींचे स्मरण करीत वाटक्रमण होते. प्रतिव्यास समजल्या जाणार्‍या महिपतींचा निरोप घेऊन वारकरी धन्य झालेला असतो.

आज मंगळवार दि.26 जुलै रोजी सकाळी 9वा. बाळकृष्ण महाराज कांबळे, दु.12वा. परिसरातील गायक, वादक, गुणीज व भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे. दु.4वा. महंत रामगिरीजी महाराज, सरला बेट यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे.

पांडुरंग महोत्सवात द्वादशीचे पारणं सोडण्यासाठी देवळाली प्रवरा येथील ग्रामस्थांनी पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य आणला होता. देवस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाबासाहेब वाळुंज, पायीदिंडी सोहळ्याचे भालदार-चोपदार राजेंद्र चव्हाण -कांतापाटील कदम व सचिन ढुस यांनी सुयोग्य नियोजन केले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या