कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव (Kopargav) तालुक्यातील टाकळी फाटा (Takali Phata) रेल्वे स्टेशनजवळ तळेगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक येथून आलेल्या ऊस तोडणी मजुराच्या तीन वर्षीय मुलीला (Child Girl) बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्याने ठार (Leopard Attack) केले. त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. त्यांनी नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. वन विभागाच्या (Forest Department) आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. नंदिनी प्रेमदास चव्हाण (वय 3) असे मयत बालिकेचे नाव आहे.
टाकळी शिवारात नांदगावहून प्रेमदास चव्हाण हे ऊस तोडणीसाठी कुटुंबासह आले होते. बुधवार, 5 नोव्हेंबरला रात्रीच्या वेळी त्यांची मुलगी नंदिनी खेळत असताना तिच्यावर बिबट्याने हल्ला (Leopard Attack) केला. तिला शेतात ओढत नेले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी तिचा शोध घेतला. नंदिनीचा मृतदेह बराच शोध घेत शेतातून बाहेर आणला. त्यानंतर ग्रामस्थांचा उद्रेक झाला. त्यांनी मृतदेह घेऊन टाकळी फाटा येथे नगर-मनमाड महामार्गावर (Nagar Manmad Highway) रस्तारोको आंदोलन सुरू केले. जोपर्यंत वन विभाग बिबट्याला जेरबंद करीत नाही, तोपर्यंत येथून हालणार नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते.
युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe), सुमित कोल्हे ग्रामस्थांमध्ये सहभागी झाले. त्यांनी वनक्षेत्र अधिकारी रोडे यांना जाब विचारला. वन अधिकार्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कोल्हे त्यांच्यावर संतापले. वन अधिकार्यांनी बिबट्याला पकडण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. टाकळी गावाच्या परिसरात बुधवारी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ऊस तोडणी मजुराच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून स्थानिक नागरिक, विशेषतः शेतकरी आणि लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या नरभक्षक बिबट्याचा तातडीने बदोबस्त करावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी वनमंत्री गणेश नाईक व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडे केली.
या घटनेनंतर आक्रमक ग्रामस्थांनी नगर-मनमाड महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको केला. यावेळी युवानेते विवेक कोल्हे तेथे पोहोचले व त्यांनी वन अधिकार्यांना जाब विचारत चांगलीच कानउघडणी केली. अनेक बिबटे फिरत असताना तुम्ही जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले? तुम्हाला मुरमाचे ट्रॅक्टर पकडून तोडपाणी करायला वेळ आहे, मग जनजागृतीचे कार्यक्रम का घेत नाही? असा जाब विचारत कोपरगावचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे यांच्यावर विवेक कोल्हे चांगलेच भडकले. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी वनविभागाचा मोठा फौजफाटा याठिकाणी दाखल झाला असून त्या नरभक्षक बिबट्याची शोधमोहीम सुरू करत त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
कोपरगाव तालुक्यात आठ दिवसांत बिबट्याने तीन जणांवर हल्ला केला आहे. शिंगणापुरात दिव्यांश पवार या लहान मुलावर बिबट्याने केलेल्या हल्यात आईने जीवाची बाजी लावून त्याची शेपूट ओढत बिबट्याला पळवले होते. तर येसगाव येथे साधना बाबर या आपल्या शेतात गवत कापत असताना यांच्यावर बिबट्याने हल्ला केला असता त्यांच्या मुलाने आईला वाचवले मात्र तिसर्या घटनेत लहान मुलीचा जीव गेला आहे.




