Thursday, May 2, 2024
Homeनगरटाकळीभान, बेलापूर, मातापूरसह 15 ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

टाकळीभान, बेलापूर, मातापूरसह 15 ग्रामपंचायतींवर प्रशासकराज

टाकळीभान | Takalibhan

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने 29 ऑगष्ट रोजी मुदत संपत असलेल्या

- Advertisement -

श्रीरामपूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींचे सरपंच आज पायउतार होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नियुक्त केलेले शासकीय कर्मचारी या 15 ग्रामपंचायतींची सुत्रे हाती घेणार असल्याने आजपासून ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरू होणार आहे.

सध्या देशभर करोनाचे संकट उभे ठाकलेले आहे. करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा करोनाशी दोन हात करण्यात गुंतलेली आहे. संसर्ग फैलावू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींच्याही निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत.

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय सरपंच म्हणून त्या त्या गावातील योग्य व्यक्तीची निवड करण्यात यावी, असे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने गेल्या महिन्यात काढले होते. त्यामुळे गावागावांत अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते.

मात्र ग्रामविकास विभागाच्या या निर्णयावर अनेक मतमतांतरे झाल्याने या निर्णयाच्या विरोधात राज्यातील काही ग्रामपंचायतींनी न्यायालयात धाव घेतली. प्रशासकीय सरपंच म्हणून शासकीय कर्मचार्‍यांचीच निवड करावी, असे मत न्यायालयाने वेळोवेळी नोंदवलेले आहे. तरीही 7 सप्टेबर रोजी सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.

प्रशासकीय सरपंचपदी कोणाची निवड करावी? याबाबतच अंतिम निर्णय न्यायालयात प्रलंबीत असला तरी श्रीरामपूर तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींची मुदत आज (दि. 29) संपणार असल्याने या ग्रामपंचायतींचा कारभार शासकीय कर्मचार्‍यांच्या हाती आजपासून सोपवला जाणार आहे.

त्यासाठी गटविकास अधिकारी यांनी गेल्या पंधरवड्यातच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, कृषी अधिकारी, बांधकाम विभागाचे शाखा आभियंता, शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख यांच्या नावाची यादी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवलेली आहे. मुख्य कार्यकारी आधिकारी त्या यादीला अंतिम मंजुरी देऊन प्रशासकीय सरपंचाच्या निवडीचे अंतिम आदेश देणार आहेत.

आज 29 सप्टेबर रोजी तालुक्यातील टाकळीभान, बेलापूर बुद्रूक, बेलापूर खुर्द, पढेगाव, वडाळा महादेव, खोकर, मुठेवाडगाव, मातापूर, भेर्डापूर, वळदगाव, महांकाळ वाडगाव, नायगाव, मालुंजा, गळनिंब, खानापूर या 15 ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने सरपंच पायउतार होऊन सदस्य मंडळाची पंचवार्षीक मुदत संपुष्टात येणार आहे. व पहिल्यांदाच ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राज सुरु होणार आहे.

अधिकार्‍यांची नियुक्ती

गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे यांनी ऑगष्टअखेर मुदत संपत असलेल्या तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार टाकळीभान येथे रावसाहेब दगडु अभंग (विस्तार अधिकारी), बेलापूर बुद्रुक येथे एस.एस.गडधे (शाखा आभियंता), मुठेवाडगाव- बापू सखाराम भालेराव (शाखा अभियंता), खानापूर- श्रीमती उषा किसन कासार (अंगणवाडी पर्यवेक्षिका), खोकर- संजीवन आर. दिवे (शिक्षण विस्तार अधिकारी), वडाळा महादेव- ए. बी. पावसे (कृषी विस्तार अधिकारी), मातापुर- श्रीमती आशादेवी दत्तात्रय लिप्टे (अंगणवाडी पर्यवेक्षिका), महांकाळ वाडगाव-नारायण दगडु गोराडे (शाखा अभियंता), नायगाव-जी. बी. गुंजाळ (शाखा अभियंता), भेर्डापुर- एन.बी.ठोळे (शाखा अभियंता), वळदगाव- श्रीमती शोभा हरीभाऊ शिंदे, मालुंजा बु. येथे आर. एस. पिसे (शाखा अभियंता), गळनिंब-आर.व्ही.कडलग (कृषी अधिकारी), बेलापुर खु. – एम.एस.अभंग (विस्तार आधिकारी), पढेगाव- एन.आर शेटे (विस्तार अधिकारी) यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यातील काही ग्रामपंचायतींची 29 ऑगष्टला मुदत संपत आहे तर काहींची 30 ऑगष्ट रोजी संपत असल्याने येत्या सोमवारपासून तालुक्यातील या पंधरा ग्रामपंचायतींवर प्रशासकीय सरपंच राज सुरु होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या