Friday, May 3, 2024
Homeनगरटाकळीभान येथे गतिरोधक बसवून दुभाजकात अंतर सोडा

टाकळीभान येथे गतिरोधक बसवून दुभाजकात अंतर सोडा

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. या रस्त्याच्या कामादरम्यान रस्त्याची रुंदी वाढवून रस्ता चकचकीत करण्यात येत आहे. याच कामामध्ये टाकळीभान गावात श्रीरामपूर व नेवासामार्गे प्रवेश करताना अखंड दुभाजक उभारण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दुभाजक अखंड न करता प्रत्येकी 50 फुटांवर नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोकळी जागा सोडावी व गावात प्रवेश करतेवेळी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवाज शेख यांनी म्हटले आहे, सध्या श्रीरामपूर नेवासा राज्यमार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. याच कामामध्ये टाकळीभान गावात श्रीरामपूर व नेवासामार्गे प्रवेश करताना दुभाजक उभारण्याचे काम सुरु आहे. वास्तविक दुभाजक लावताना श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गाला जे जोडरस्ते येऊन मिळतात त्याठिकाणी मोकळी जागा सोडणे अपेक्षित आहे. मात्र दोन्ही बाजूने डिव्हायडर उभारताना केवळ मध्यभागी मुख्य चौकातच प्रचंड मोठा गॅप सोडलेला आहे.

श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गाला गुजरवाडीवरुन येणारा जोडरस्ता येतो. त्या रस्त्यावरुन प्रचंड वर्दळ असते. तसेच त्याच रस्त्याच्या समोरुन (विरुद्ध बाजूने) सरकारी दवाखान्याच्या पुर्वेकडून गावातील मुख्य पेठेत, बँकेत, शाळेत जाण्यासाठी रस्ता आहे. श्रीरामपूर-नेवासा रस्त्याच्या दक्षिणेकडील जास्तीत जास्त नागरिक या रस्त्याचा पर्यायी व सुरक्षित रस्ता म्हणून वापर करतात. मात्र अखंड दुभाजकामुळे या रस्त्याचा वापर होण्याऐवजी गावातील मुख्य चौकातील रस्त्याचा वापर होऊन मुख्य चौकातच जास्त गर्दी होणार आहे. पर्यायाने मुख्य चौकात अपघाताचे प्रमाण वाढू शकते. तसेच अखंड दुभाजकामुळे गावातील व्यापारावरही प्रतिकुल परिणाम होणार आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता टाकळीभान गावातील दुभाजक अखंड ठेवण्याऐवजी प्रत्येकी 50 फुटांवर गॅप ठेवावा. तसेच दुभाजक उभारताना सरकारी दवाखान्यालगतच्या पर्यायी रस्त्यासमोर चारचाकी वाहन जाईल एवढा गॅप ठेवावा. जेणेकरुन गावातील मुख्य चौकात गर्दी होणार नाही.

हा राज्यमार्ग अत्यंत वर्दळीचा झालेला आहे. त्यातच रस्ता गुळगुळीत होत असल्याने वाहने या वर्दळीच्या परीसरातूनही वेगाने जात आहेत. त्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी दुभाजकाच्या पट्यात किमान पाच ते सहा गतिरोधक बसवावे व त्यावर पांढर्‍या रंगाचे पट्टे मारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

नेवासा हे तालुक्याचे शहर तरी तेथे दुभाजक बसवण्यात आलेले नाही. श्रीरामपूर शहरातील दुभाजकात ठिकठिकाणी ये-जा करण्यासाठी मोकळी जागा ठेवलेली आहे. या शहरांच्या तुलनेत टाकळीभानची बाजारपेठ छोटी असल्याने अखंड दुभाञकामुळे व्यापार धंद्यावर मोठा प्रतिकुल परिणाम होणार असल्याने व्यवसायिकांपुढे अखंड दुभाजकाचे मोठे संकट उभे राहिल्याने व्यवसायीक हबकुन गेले आहेत.

– नवाज शेख, जिल्हा कार्याध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या