Thursday, May 2, 2024
Homeनगरटाकळीभान पशुवैद्यकीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात नो लम्पी

टाकळीभान पशुवैद्यकीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात नो लम्पी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान पशु वैद्यकीय केंद्राअंतर्गत येणार्‍या 9 गावामध्ये अद्याप एकही लम्पी बाधीत जनावर नसून खानापूर येथील एका संशयीत जनावराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या केंद्राअंतर्गत लम्पीचा शिरकाव रोखण्यासाठी तीन गावातील 4 हजार 900 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती टाकळीभानचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप कोकणे यांनी दिली.

- Advertisement -

टाकळीभान पशु वैद्यकिय केंद्राअंतर्गत टाकळीभान, भोकर, घुमनदेव, कमालपूर, मुठेवाडगाव, माळवाडगाव, खानापूर, महांकाळ वाडगाव, भामाठाण ही 9 गावे सामाविष्ट आहेत. सर्वत्र लम्पीने हाहाकार माजवला असला तरी या केंद्राअंतर्गत अद्याप लम्पी बाधीत जनावर आढळलेले नाही. याबाबत सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. कोकणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लम्पीचा शिरकाव आपल्या परिसरात होवू नये यासाठी पशुधनाची मोठी संख्या असलेल्या टाकळीभान, भोकर व घुमनदेव या तीन गावांमध्ये प्रथम लसिकरण मोहीम हाती घेण्यात आली होती.

27 ऑगस्टपासून या तीन गावातील 4 हजार 900 जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. टाकळीभान येथे सापडलेल्या एका संशयीत जनावराचे रक्ताचे नमुने नकारार्थी आले आहेत. या तीन गावांमध्ये आणखी 700 लसींची मागणी करण्यात आली आहे. केंद्राअंतर्गत येणार्‍या कमालपूर, माळवागाव, मुठेवाडगाव, खानापूर, व महांकाळ वाडगाव या गावांसाठी 2 हजार लसींची मागणी करण्यात आली आहे. खानापूर येथे एक संशयीत रुग्ण आढळला असून त्याचेही रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर, श्रीरामपूर तालुका लघु चिकित्सालय सहाय्यक आयुक्त डॉ. मच्छिंद्र कोते, श्रीरामपूर पंचायत समितीचे पशुधन विकास आधिकारी डॉ. विजय धिमटे, खैरी निमगावचे पशु वेद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल सानप, मातापूरचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. सिनारे यांनी वेळोवेळी भेटी देऊन लसिकरणाबाबत मार्गदर्शन केल्याने लासीकरणाचा थोड्या कालावधीत 5 हजाराचा टप्पा गाठता आल्याचे सांगून शेतकर्‍यांनी गोठ्यातील पशुधनाची गोचिड, डास यापासून संरक्षण करण्यासाठी फवारणी करावी व गोठे स्वच्छ ठेवण्यासाठी विषेश काळजी घ्यावी व लम्पीपासून पशुधन वाचवावे, असे आवाहन डॉ. कोकणे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या