Tuesday, May 7, 2024
Homeमुख्य बातम्याकमवा आणि शिका योजनेचा लाभ घ्या : बनसोड

कमवा आणि शिका योजनेचा लाभ घ्या : बनसोड

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ( Rural Areas )अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील निवडक गुणवंत आणि होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 2022-23 या वर्षांपासून ‘कमवा आणि शिका’ ( Learn & Earn) ही ज्ञान कौशल्यावर आधारित नावीन्यपूर्ण शैक्षणिक योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामध्ये (Social Welfare Department of Zilla Parishad) तीन वर्षांसाठी प्रशासकीय काम करण्याची आणि पदवीनंतरच्या नोकरीसाठी आवश्यक विविध ज्ञान-कौशल्ये आत्मसात करुन देण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्या बी. बी. ए. (सेवा व्यवस्थापन) या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद सेस फंडातून 20 टक्के मागासवर्गीय निधी अंतर्गत विद्यावेतन देण्याचीही नावीन्यपूर्ण योजना राबविली जाणार आहे.

या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षीं आठ हजार रुपये, दुसर्‍या वर्षी नऊ हजार रुपये आणि शेवटच्या वर्षांसाठी दहा हजार रुपये विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनासाठी खर्च भागविण्यासाठी मदत म्हणून दरमहा चार हजार रुपये प्रमाणे प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येईल. तसेच सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसर्‍या वर्षांच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बी. बी. ए. (सेवा व्यवस्थापन) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे कार्यालयाकडून प्रमाणपत्र असा विद्यार्थ्यांचा दुहेरी फायदा होणार आहे.

या योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जुलै अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/zpnashikibba2022 ही ऑनलाईल लिंक समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, नाशिक यांच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 18 ते 22 वर्षे वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या गुणवंत व होतकरु मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या