मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील ‘राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा’ (नीट) पारदर्शक, सुरक्षित आणि तणावरहित वातावरणात सुरळीत पार पडावी, यासाठी अत्यंत दक्ष राहून काटेकोर उपाययोजना कराव्यात. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी सर्व यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘वर्षा’ निवासस्थानी नीट परीक्षेच्या पूर्वतयारीबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नीट परीक्षा केंद्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध सूचना केल्या. नीटच्या सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा सतत कार्यरत ठेवावी आणि त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात यावे. तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची ओळख पडताळणी आणि तपासणी प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडावी. परीक्षा प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांनी घ्यावी, असे फडणवीस म्हणाले.
जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर
विद्यार्थी आणि पालकांपर्यंत परीक्षेसंबंधी अचूक माहिती पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरल्यास तातडीने खुलासा करून संभ्रम निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.
पुणे, लातूरवर विशेष लक्ष द्या!
पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश फडणवीस यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
या बैठकीला गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, राज्य गुप्तचर विभागाचे आयुक्त शिरीष जैन तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.




