Saturday, May 4, 2024
Homeनाशिकयेवल्या तालुक्यातील बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव

येवल्या तालुक्यातील बारा गावांचे टँकरचे प्रस्ताव

येवला । Yeola

दुष्काळी असलेल्या येवल्या तालुक्यात यंदा जोरदार पाऊस होऊनही, पूर्व भागात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. मार्च महिना सुरू असतांनाच 12 गावातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे. टंचाईची धग वाढण्याची भीती असून कृती आराखड्यात 88 गावाना टंचाईची झळ बसेल असे गृहीत धरून उपाययोजना सुचविल्या आहेत.

- Advertisement -

यावर्षी तालुक्यात सुरूवातीपासूनच पावसाने कृपा केल्याने 792 मिलिमीटर म्हणजेच 154 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे यंदाचा खरीपासह रब्बी हंगामही जोमात निघाला आहे. याला अपवाद पूर्व भागातील काही गावे ठरली असून, जोरदार पाऊस होऊनही जानेवारीच्या मध्यावर अचानक विहिरींचा उपसा होऊ लागल्याने अनेकांची गहू, हरभरा, कांद्याची पिके घेण्याची देखील पंचायत झाली होती. किंबहुना टँकरने विकत पाणी घेऊन कांदा पिक काढण्याचे प्रकार राजापूर, ममदापुर, भारम परिसरात पाहायला मिळाले.

त्यानंतर महिनाभरातच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ही गहन बनू लागला आहे. पूर्व भागातील अवर्षणप्रवण गावांमध्ये पाणी योजनांसह गावाला पुरवठा करणार्‍या साधन सामग्रीने मान टाकल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे टंचाईग्रस्त गणेशपुर, तळवाडे, खरवंडी, देवदरी, ममदापुर, तांडा,कोळगाव, वाईबोथी, वसंतनगर, कुसमाडी, जायदरे, आहेरवाडी या 12 गावासह शिवाजीनगर ममदापूर तांडा या वाड्यातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी झाली आहे.

पंचायत समिती स्तरावर हे ठराव प्राप्त झाले असून त्याच्या स्थळ पाणीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. भूजल पातळीत अचानक मोठी घट झाल्याने टंचाईचा उद्रेक होत असल्याचेही सांगितले जात आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा टंचाईची धग कमी राहील. पावसामुळे अनेक गावांना पाणी उपलब्ध आहे तरीही दोनशेहून अधिक हातपंप दुरुस्ती व इतर उपाययोजना केल्या असून आत्ताही मागणीनुसार टंचाईवर पर्याय शोधून नागरिकांचे हाल होणार नाही यासाठी आम्ही आत्तापासूनच दक्षता घेत आहोत..

– प्रवीण गायकवाड, सभापती पंचायत समिती

पंचायत समितीने तीन टप्प्यात टंचाईचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये एप्रिल ते जून या दरम्यान टंचाईग्रस्त गावांची संख्या 52 गावे व 36 वाड्या अशी 88 वर पोहोचू शकेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या टंचाईच्या दृष्टीने सात ठिकाणी नव्याने विंधन विहीर घेण्यास, आठ ठिकाणी विहीर खोल करणे, एक ठिकाणी विहीर अधिग्रहण व उर्वरित 82 ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.

त्यादृष्टीने पंचायत समिती स्तरावरून नियोजनही सुरू आहे. मात्र उन्हाळ्यात पाणीच उपलब्ध होत नसल्याने या उपाययोजनाही कूचकामी ठरत असल्याचे वर्षानुवर्षे दिसत आहे. विशेष म्हणजे तालुक्यात दरवर्षी 50 च्या आसपास गावांना टँकरची गरज भासते.

वर्षानुवर्ष हीच स्थिती असून या गावांचे दुष्काळी पण केव्हा जाईल हा प्रश्नच आहे. समाधानकारक म्हणजे 38 गाव नळपाणी पुरवठा योजनेतून तब्बल 57 गावे टँकरमुक्त झाली आहे. त्यामुळे मागील पाच-सहा वर्षापासून या गावांची टंचाईतूनन कायमची सुटका झाली आहे. ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या