Wednesday, January 15, 2025
Homeनगरदातांवर येतेय आता काळी बुरशी

दातांवर येतेय आता काळी बुरशी

नगरमध्ये आढळले रुग्ण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरमध्ये डेंग्यू (Dengue) आणि चिकुनगुनियाच्या (Chikungunya) लाटेतून सहीसलामत बाहेर पडलेल्या रुग्णांच्या दातांवर काळी बुरशी (Teeth Black Fungus) आल्याची स्थिती झाली आहे. अनेक रुग्ण आता काळ्या बुरशीची लागण झाल्याची तक्रार घेऊन दंत वैद्यांकडे येत आहेत. त्यामुळे त्यांचे दाताचे वरचे जबडे काढण्यापर्यंतचे उपाय करावे लागत आहेत. या नव्या आजाराने शहरवासियांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

- Advertisement -

डेंग्यू, चिकुनगुनियानंतर आता काळ्या बुरशीची लागण होत असून, अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याभरात आपल्या एकट्याच्याच क्लिनिकमध्येच चार ते पाच रुग्ण येऊन गेल्याचे येथील दंतरोग तज्ज्ञ डॉ. संजय आसनानी यांनी सांगितले. दोन-तीन महिन्यांपूर्वी नगरमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाची लाट आल्याची स्थिती होती. त्यानंतर यातून बरे झालेले अनेक रुग्ण आता काळ्या बुरशीची (Black Fungus) लागण झाल्याची तक्रार घेऊन येत आहेत. त्यामुळे त्यांचे दाताचे वरचे जबडे काढण्यापर्यंतचे उपाय करावे लागत आहेत, असेही डॉ. असनानी यांनी सांगितले.

कोव्हिडच्या (Covid) दुसर्‍या लाटेत काळ्या बुरशीची (म्युकर मायकॉसिस) लागण झालेले रुग्ण (Patient) वाढले होते. आता कोव्हिड नसला तरी डेंग्यू आणि चिकुनगुनिया होऊन गेलेल्या रुग्णांनाही काळ्या बुरशीची लागण झाल्याचे आढळून येत आहे. गेल्या महिन्याभरात असे रुग्ण वाढल्याचे दंतरोग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. असे काही रुग्ण नगरमध्येच तर काही रुग्ण पुण्याला जाऊन उपचार घेत आहेत. प्रशासनाकडे या आजाराची नोंद करण्याची केंद्रीय यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांची नेमकी संख्या समजू शकत नाही. मात्र, दंत वैद्यांकडे महिन्यातून चार-पाचजण अशा आजाराचे रुग्ण येत असल्याने त्यावरून अंदाज बांधला जाऊ शकतो.

कोव्हिड बरा झाल्यानंतर 2021-22 मध्ये अचानकपणे काळ्या बुरशीचे रुग्ण वाढले होते. कोव्हिड (Covid) बरा करण्यासाठी देण्यात आलेल्या स्टिरॉइडमुळे हा रोग झाल्याचा निष्कर्ष त्यावेळी काढण्यात आला होता. मधल्या काळात फारच कमी असे रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या महिन्याभरात पुन्हा अशा रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येते. याबद्दल येथील दंतरोग तज्ज्ञ डॉ. आसनानी यांनी सांगितले, कोव्हिडनंतर येणार्‍या अशा रुग्णांना मधुमेह असल्याची पार्श्वभूमी होती. आता मात्र मधुमेह नसलेल्या रुग्णांमध्येही काळ्या बुरशीची लागण झाल्याचे दिसून येत आहे. कदाचित डेंग्यू (Dengue) आणि चिकुनगुनियासाठी (Chikungunya) वापरण्यात आलेल्या स्टिरॉइडच्या अती वापराचा हा दुष्परिणाम असण्याची शक्यता आहे. सुदैवाने यावेळी या बुरशीचा प्रसार कमी वेगाने होत आहे. मागील वेळी ही बुरशी वेगाने डोळे आणि मेंदूपर्यंत पसरत असल्याने डोळे काढून टाकण्यापर्यंतचे उपाय करावे लागत होते. सध्या केवळ दातांपर्यंत त्याचा प्रसार होत आहे. असे असले तरी रुग्णांनी लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. आसनानी यांनी केले आहे.

काळ्या बुरशीची लक्षणे
चेहर्‍यावर एकतर्फी वेदना, सुन्नपणा किंवा सूज, दात दुखणे, हालणे, दातातून पू येणे, जबडा गुंतणे, वेदना होणे…अशी लक्षणे असून, काळ्या बुरशीची लक्षणे आढळून आल्यावर रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने आपल्या डॉक्टरांना भेटावे. लवकर निदान व उपचार झाल्यास शरीराचे कमीत कमी नुकसान होऊन आजार बरा होऊ शकतो, असेही डॉ. संजय आसनानी यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या