Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशTelangana Accident : भीषण अपघात! प्रवासी बस-ट्रकची धडक, २० जणांचा मृत्यू

Telangana Accident : भीषण अपघात! प्रवासी बस-ट्रकची धडक, २० जणांचा मृत्यू

मुंबई । Mumbai

तेलंगणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यात आज (सोमवारी) सकाळी एक अत्यंत दुःखद आणि भीषण अपघात झाला आहे. खडी भरलेल्या एका ट्रकची राज्य परिवहन महामंडळाच्या (TSRTC) बसशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत किमान २० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही बस तंदूर डेपोची होती आणि सुमारे ७० प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे जात होती. चेवेल्ला मंडल (ब्लॉक) अंतर्गत येणाऱ्या मिर्झागुडा गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या लॉरीने (ट्रकने) बसला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की बस रस्त्यावरच उलटली. या धडकेमुळे लॉरीतील संपूर्ण खडी बसवर कोसळली आणि अनेक प्रवासी आतमध्ये अडकून पडले. या घटनेनंतर काही वेळातच संपूर्ण परिसरात हाहाकार माजला.

YouTube video player

अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये बस आणि लॉरीच्या चालकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अनेक महिला प्रवासी आणि एका केवळ १० महिन्यांच्या चिमुकल्याचाही मृतांमध्ये समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. त्यांच्या मदतीमुळे काही प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन पथके आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

ढिगारा आणि खडी बाजूला करून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांना मोठी कसरत करावी लागली. त्यासाठी तब्बल तीन जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने अधिक चांगल्या उपचारांसाठी हैदराबाद येथील प्रमुख रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे, तर उर्वरित जखमींवर चेवेल्ला येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बस कंडक्टर राधा यांच्यासह एकूण १५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

या बचावकार्यादरम्यान चेवेल्ला सर्कल इन्स्पेक्टर भूपाल श्रीधर यांना देखील दुर्दैवाने जेसीबी मशीनमुळे किरकोळ जखमा झाल्या. त्यांना त्वरित उपचारांसाठी चेवेल्ला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या भयंकर दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख आणि शोक व्यक्त केला आहे. त्यांनी तातडीने मुख्य सचिव (CS) के. रामकृष्ण राव आणि पोलिस महासंचालक (DGP) बी. शिवधर रेड्डी यांना बचाव आणि मदत कार्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री रेड्डी यांनी जखमींना विनाविलंब सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करण्याचे आणि गंभीर जखमींना उपचारांसाठी तातडीने हैदराबादला हलवण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. प्रशासनाने युद्धपातळीवर काम करून पीडितांना सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...