चेन्नई | Chennai
दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री वीजे चित्रा (VJ Chitra) ने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी तिने घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे चाहते हादरले आहेत.
चित्राचा अलिकडेच प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत रवीसोबत साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघे एकत्र देखील राहत होते. मात्र, अचानकपणे चित्राने आत्महत्या केल्याने मनोरंजन विश्व हादरले आहे. चेन्नईतील नसरपेट येथील हॉटेलमध्ये चित्राने गळफास घेतला. नैराश्य आल्यामुळे चित्राने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. इवीपी फिल्मसिटीमधील चित्रीकरण संपल्यानंतर चित्रा रात्री २.३० वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. त्यानंतर तिने गळफास घेतल्याचे हेमंतने सांगितले.
शुटींग संपल्यावर चित्रा हॉटेलमध्ये आली आणि आंघोळीला जाते सांगून बाथरुममध्ये गेली. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही, त्यामुळे मी दार वाजवले. पण आतून आवाज आला नाही. त्यानंतर मी हॉटेल स्टाफला सांगून बनावट चावीने दरवाजा उघडला त्यावेळी चित्राचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती हेमंतने पोलिसांना दिली.
वीजे चित्रा या प्रामुख्याने टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या होत्या. त्यांना पांडियन स्टोर्स मालिकेमुळे अधिक ओळखले जाते. त्या प्रदीर्घ काळापासून त्या मालिकेत मुलई नामक व्यक्तीरेखा साकारत होत्या. त्यांची लोकप्रियता या मालिकेमुळे प्रचंड वाढली होती. परंतू आता त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि निकटवर्तीयांना धक्का बसला आहे.