कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात माता रमाई आंबेडकर जयंतीच्या फलकाचा अवमान केल्याच्या घटनेमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ भीमसैनिक आणि महिला भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर ठिय्या आंदोलन छेडले आहे.

संतप्त नागरिकांनी कोपरगाव बंदची हाक दिली असून, त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तणावपूर्ण परिस्थिती पाहता डीवायएसपी शिरीष वमने, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

ठिय्या आंदोलन बस स्थानक परिसरात झाल्यामुळे कोपरगाव बस स्थानकातील संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना याचा मोठा फटका बसला. सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. तसेच, शहरातील संपूर्ण रिक्षा ही बंद ठेवण्यात आल्या आहे.

फलकाच्या अवमानामुळे आंबेडकरी समाजाच्या नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. समाज बांधवांनी त्वरित कारवाईची मागणी केली आहे. घटनेचा तपास सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.