Wednesday, December 4, 2024
Homeनगरटीईटी परीक्षेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

टीईटी परीक्षेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर

आज होणार लोकसेवा आयोगापेक्षा कडक परीक्षा

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात येणार्‍या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी आधुनिक तंत्राचा वापर करत परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीचा मोठे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज रविवारी होणार्‍या परीक्षेत नव्या तंत्राचा प्रथमच उपयोग केला जाणार आहे. यात फेस रिडींग, बायोमेट्रिक स्वरूपात उपस्थिती घेतली जाणार आहे. पेपर फुटीच्या घटना आणि शिक्षक पात्रता परीक्षेत झालेला गैरव्यवहार ही पार्श्वभूमी लक्षात घेता परीक्षा परिषदेने यंदा परीक्षेसाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

- Advertisement -

परीक्षा परिषदेच्या माध्यमातून रविवार दि. 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत मेटल डिटेक्टरने प्रत्येक विद्यार्थ्याची कसून तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेपूर्वी दीड तास आधी परीक्षा केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. परिषदेच्या माध्यमातून 21 नोव्हेंबर 2021 रोजी शेवटची टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 4 लाख 68 हजार 679 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. परिषदेतर्फे आज आठवी टीईटी परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून 3 लाख 53 हजार 937 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट होणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाख 15 हजार 626 तर विद्यार्थिनींची संख्या 2 लाख 37 हजार 417 असून 9 ट्रान्सजेंडर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नोंदणी करणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 887 आहे.

परिषदेने टीईटी परीक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केल्यानंतरच त्याला परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याचे नियोजन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची फेस रिडींग तसेच बायोमेट्रिकच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. अर्ज भरताना दिलेल्या माहितीनुसार ही तपासणी केली जाणार असून परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही बदल असल्यास संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेर्‍याच्या माध्यमातून राज्यभरातील केंद्रांवर वॉररूमच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे.

एखाद्या परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक काही मिनिटे एका जागेवरून दुसर्‍या जागी हलला तरी सुद्धा या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अलर्ट दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे 30 विद्यार्थ्यांपेक्षा जास्त व्यक्ती एखाद्या केंद्रावर किंवा वर्गात कुठून आले हे सुद्धा तपासण्याची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा अद्याप अशा पद्धतीची परीक्षा घेतली नाही, असा दावा परीक्षा परिषदेच्या अधिकार्‍यांकडून केला जात आहे. राज्यातील 1 हजार 23 परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा होणार असून वर्गखोल्या, केंद्र, संचालक कार्यालय, प्रवेशद्वार व बाहेर जाण्याचे द्वार अशा एकूण 18 हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

माध्यमनिहाय विद्यार्थी संख्या…
मराठी : 2,74,435, इंग्रजी : 21,588, उर्दू : 17,659, हिंदी : 39,302, बंगाली : 115, कन्नड : 799, तेलुगू : 14, गुजराती : 25, सिंधी : 0.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या