मुंबई | Mumbai
नीट पेपरफुटीनंतर महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या टीईटी पेपर फुटीचेही आता दिल्ली अन् हरयाणा कनेक्शन समोर आले आहे. उद्या २८ जून रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. सहारा विमानतळ परिसरातून या संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करत बेड्या ठोकल्या आहे. त्यानंतर, अपर पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषद घेऊन टीईटी पेपर फुटीसंदर्भात माहिती दिली.
एका पेपरची किंमत दीड कोटी रुपये
टीईटी पेपरफुटीच्या संदर्भाने भिवंडी पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही धक्कादायक खुलासे केले आहेत. भिवंडी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून यातील २ आरोपी बिहारमधील आहेत, तर एक आरोपी हरियाणामधला आहे. एका पेपरची किंमत तब्बल दीड कोटी रुपये ठरली होती, असे भिवंडीचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितले. तसेच पेपरफुटीचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची स्थापना केली असून एसीपींच्या नेतृत्वाखाली ८ पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी काम करून पेपरफुटीचा तपास करतील, अशीही माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दुधे यांनी दिली.
मुख्य संशयित अद्याप फरार
टीईटी पेपर विक्रीसाठी आरोपी दिल्लीतून आले होते. त्यामध्ये, राजीव शाह (बिहार) (४५), आकाश कुमार (बिहार)(३०) आणि धीरज कुमार (हरियाणा)(२८) अशी आरोपींची नावे आहे. मात्र, याप्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिसांच्या झडतीत ४ पेपरचे सेट मिळाले असून मोबाईल, डेबिट कार्ड देखील मिळाले आहेत. पोलिसांनी, भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) ३१६(५) ६१(२), सह महाराष्ट्र परीक्षाअधिनियम २०२४ या प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींसाठी ट्रॅप लावण्यात आला होता. आरोपी दिल्लीवरुन पेपर विकण्यासाठी भिंवडीला आले होते, कोणासाठी पेपर विकायला आले होते, कोणाला विकला, कुणी घेतला? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून जे पेपर विकत घेणार होते, ते पुढे जाऊन पैसे घेऊन पुढे विकणार होते, अशी माहिती समोर आल्याचेही पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली. उमेदवार- कोचिंग सेंटर, तसेच दुसऱ्या कुणी व्यक्ती पेपर विकत घेणार होते का? हे देखील तपासत आहोत, असे पोलीस अधिकारी दुधे यांनी सांगितले.




