मुंबई | Mumbai
राज्यातील लाखो डी.टी.एड आणि बी.एड धारक विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. उद्या म्हणजेच २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात होणारी शिक्षक पात्रता परीक्षा तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) २८ जून रोजी होणारी परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच आता TET परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्याने परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या परीक्षेबाबतचे एक पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, उद्या होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे.
पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक
ठाण्यातील भिवंडीतून टीईटी परीक्षेचा पेपर फुटला. या प्रकरणात महत्त्वाची कारवाई करत भिवंडीतील कोनगाव पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतलेय. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी प्रकरणातील संशयित थांबले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, पोलिस पोहोचण्यापूर्वीच संशयित तेथून पसार झाले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सहारा विमानतळ परिसरातून तिघा संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पुढील चौकशीसाठी भिवंडीत आणले असून, त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
TET परिक्षा पुन्हा केव्हा होणार?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, परीक्षा पुढे ढकलण्यात आली असली तरी नवीन तारखेचे नियोजन सुरू आहे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सदर प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस करत आहेत. चौकशीनंतर त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकारची परीक्षा घेण्यासाठी तीन आठवड्यांची प्रक्रिया असते, असे प्रिया शिंदे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्रातील ६ लाख १२८ शिक्षकांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. ६ लाख १२६ परिक्षार्थींकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. येत्या २ ते ३ दिवसांनी TET परीक्षेची नवीन तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती प्रिया शिंदे यांनी दिली. तसेच 37 शहरातील १०२८ परिक्षा केंद्रावर पुन्हा नव्याने परिक्षा घेतली जाणार आहे, असेही प्रिया शिंदे यांनी सांगितले.
पेपर फुटीचे प्रकरण उघडकीस कसे आले?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २८ जून रोजी राज्यभरात TET परीक्षा घेण्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था केली होती. मात्र, २७ जूनच्या पहाटे भिवंडी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेतील माहिती असल्याचे समजल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.
यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून 2026 परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.




