Friday, May 3, 2024
Homeनाशिकखाजगी संस्थेमार्फत नोकरभरती करण्यास ठाकरे गटाचा विरोध; महापालिका आयुक्तांना निवेदन

खाजगी संस्थेमार्फत नोकरभरती करण्यास ठाकरे गटाचा विरोध; महापालिका आयुक्तांना निवेदन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वशिलेबाजीला स्थान मिळू नये आणि ही प्रक्रिया पारदर्शी व निष्पक्ष व्हावी असे वाटत असेल तर यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून नाशिक महानगरपालिकेत (Nashik Municipal Corporation) होणारी नोकरभरती प्रक्रिया राबविण्याची जबाबदारी खाजगी संस्थेवर न सोपविता महापालिकेने स्वत: पार पाडावी अशा आशयाचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे (Thackeray Group) महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहे…

- Advertisement -

महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून सरळ सेवा भरती (Direct Service Recruitment) झालेली नाही. नाशिक महानगरपालिका सध्या ब संवर्गात असली तरी आस्थापना परिशिष्ट मात्र क संवर्गातील जुनेच आहे. त्यातही या आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गातील मंजुर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने महानगरपालिकेला आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील भरतीच्या पदांना मान्यता दिली असून ती पदे टाटा कन्सल्टन्सीमार्फत भरण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

तसेच यापूर्वी विविध शासकीय विभागासाठी खाजगी यंत्रणेमार्फत नोकरभरती करण्याचा झालेला प्रयत्न फोल ठरलेला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचेही निदर्शनास आले आहे. याप्रकरणी अनेक जबाबदार अधिकार्‍यांचे निलंबनही झाले. त्यामुळे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी ठाकरे गटाने आयुक्तांकडे केली आहे.

दरम्यान, यावेळी शिवसेना उपनेते (ठाकरे गट) सुनील बागुल, सहसंपर्क नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वंसत गिते, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, गटनेते विलास शिंदे, महेश बडवे, सचिन मराठे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधनी, नाना पाटील मसूद जिलानी यांच्यासह आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या