Saturday, July 4, 2026
Homeराजकीयठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार सोडणार साथ?

ठाकरेंना आणखी एक धक्का? सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार सोडणार साथ?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अंतर्गत संघर्ष संपण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर, आता ठाकरे गटाचे आणखी एक निष्ठावंत मानले जाणारे विधान परिषद आमदार सुनील शिंदे यांना आपल्या गळाला लावण्याची जोरदार तयारी ‘शिंदे’ सेनेने सुरू केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जर हा प्रवेश झाला, तर मुंबईतील विशेषतः वरळी मतदारसंघातील ठाकरे गटाचे वर्चस्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

सचिन अहिर यांच्या पक्षांतरामुळे आधीच ठाकरे गोटात चिंतेचे वातावरण असताना, आता सुनील शिंदे यांच्याबाबत सुरू असलेल्या हालचालींमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. ठाकरे गटाकडे सद्यस्थितीत विधान परिषदेत अवघे पाच आमदार उरले आहेत. त्यापैकी सुनील शिंदे हे २०२१ मध्ये, म्हणजेच शिवसेना एकसंध असताना, पक्षाच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडून आले होते. सचिन अहिर यांच्या बाबतीतही नेमकी हीच कायदेशीर बाजू ‘शिंदे’ सेनेच्या पथ्यावर पडली आहे. मूळ चिन्हावर निवडून आल्यामुळे तांत्रिक आणि कायदेशीर कारवाई करणे ठाकरे गटासाठी अडचणीचे ठरत आहे. नेमका हाच धागा पकडून सुनील शिंदे यांनाही सोबत घेण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखल्याचे बोलले जात आहे.

सुनील शिंदे यांची विधान परिषदेची मुदत २०२७ मध्ये संपणार आहे. सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशानंतर सुनील शिंदे यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले होते, “आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. सचिन अहिर यांच्या हालचालींबद्दल मला आधीच अंदाज आला होता, पण मी एक छोटा कार्यकर्ता असल्याने त्यावर भाष्य करू शकलो नाही.” शिंदे यांच्या या विधानावरून ठाकरे गटांतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून, याचाच फायदा उठवत त्यांना आपल्या गोटात खेचण्यासाठी शिंदे सेनेकडून प्रयत्न सुरू आहेत.

सचिन अहिर यांना शिंदे सेनेत प्रवेश करताच विधान परिषदेचे उपसभापती पद मिळण्याची शक्यता असल्याने, इतर नाराज आमदारांनाही मोठी पदे देऊन आकर्षित केले जात असल्याची चर्चा आहे. सध्या ठाकरे गटाकडे विधान परिषदेत सुनील शिंदे, ज.मो. अभ्यंकर, अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब हेच प्रमुख चेहरे उरले आहेत. अशा परिस्थितीत जर सुनील शिंदे यांनीही ‘धनुष्यबाण’ हाती घेतला, तर वरळीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते. आगामी काळात मुंबईतील हे सत्ताकारण कोणते नवे वळण घेते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस; वाहतुकीची कोंडी

0
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यावर्षी प्रथमच नार, पार, तान, मान, अंबिका, गिरणा, कादवा या नद्यांना पुर...