दिल्ली । Delhi
थायलंडमधून एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी समोर आली आहे. राजधानी बँकॉकजवळ एका रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना, एक अवाढव्य क्रेन धावत्या ट्रेनवर कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत २२ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बँकॉकच्या ईशान्येला सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ भागात घडला. बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित ट्रेन उबोन रत्चाथानीच्या दिशेने जात असताना, मार्गावर सुरू असलेल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाची एक महाकाय क्रेन अचानक ट्रेनच्या डब्यांवर कोसळली.
क्रेन कोसळल्याचा वेग आणि वजन इतके जास्त होते की, रेल्वेचे डबे अक्षरशः चिरडले गेले. या भीषण धडकेनंतर रेल्वेला मोठी आग लागली, ज्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये रेल्वेचा झालेला चक्काचूर आणि आगीचे लोळ स्पष्टपणे दिसत आहेत. क्रेन आणि ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की रेल्वेचे छत पूर्णपणे कोसळले असून खिडक्या आणि दरवाजे निखळून पडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सध्या गॅस कटर आणि क्रेनच्या साहाय्याने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या कामात वापरली जाणारी क्रेन तांत्रिक बिघाडामुळे पडली असावी असा अंदाज आहे. क्रेन आणि रेल्वेचे डबे एकमेकांत अडकल्याने ढिगारा उपसण्याचे काम आव्हानात्मक ठरत आहे. या दुर्घटनेमुळे थायलंडमध्ये हळहळ व्यक्त केली जात असून रेल्वे प्रशासनाकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.




