Sunday, May 5, 2024
Homeनाशिकरासायनिक प्रक्रियेद्वारे त्र्यंबकेश्वर मंदिरातील सभामंडप आणि गर्भगृहास झळाळी

रासायनिक प्रक्रियेद्वारे त्र्यंबकेश्वर मंदिरातील सभामंडप आणि गर्भगृहास झळाळी

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी | Trimbakeshwar

येथे रासायनिक प्रक्रियेद्वारे त्र्यंबकेश्वर मंदिराची (Trimbakeshwar Temple) स्वच्छता करणे आणि मंदिराला झळाळी देण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाच्या (Archaeological Survey of India) विज्ञान शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सध्या सुरू आहे. त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन ज्योतिर्लिंगाच्या संवर्धन जतन काम हे भारतीय पुरातत्व खात्याच्या म्हणजेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते. पूर्वीच्या प्राचीन मंदिराचा पेशवे काळात काळ्या दगडी पाषाणात त्र्यंबकेश्वर येथील मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. सन १७५५ ते १७८५ या काळात दहा लाख रुपये खर्च करून हे काम तेव्हा पूर्ण करण्यात आले होते. .

- Advertisement -

सध्या दिसणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम २४० वर्षांपूर्वी झाले आहे.अप्रतिम अशा मंदिर वास्तुकलेचा, शिल्पकलेचा नमुना म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर हे जगभर प्रसिद्ध आहे. शिवाय धार्मिक दृष्ट्या बारा ज्योतिर्लिंगापैकी मुख्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.अशा धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या अंतर्गत सभामंडप जतन व संवर्धनाचे काम तसेच आतील बाजूस धुरामुळे काळवंडलेल्या भागाला झळाळी देण्याचे काम सुमारे पंधरा लाख रुपये खर्च रासायनिक प्रक्रियेद्वारे ०३ ऑक्टोबरपासून सुरू आहे. या कामासाठी विविध रसायनाचा वापर करून मंदिराला मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यात येत आहे.

पुरातत्व विभागाच्या तज्ञांच्या देखरेखीखाली भिंतीचे काळे पडलेले दगड स्वच्छ करण्यात येत आहे. सभामंडपाच्या घुमुटाची स्वच्छता करताना अतिशय दक्षता, जोखीम कामगारांना घ्यावी लागली आहे. यासोबतच नंदी मंदिर मंडपातील भगनावस्थेत असलेल्या दगडी जाळींचे सुद्धा जतन संवर्धन होत आहे. हे काम करण्यासाठी मंदिरांतर्गत पाहाड बांधण्यात आला होता. रात्रीच्या वेळेस हे काम २५ मजूर करत होते. सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे हे काम तूर्तास थांबवलेले असून काम सुरू झाले की गर्भगृहातील झळाळी कामाकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

दरम्यान, भवन यांच्या मार्गदर्शनाखाली पुरातत्त्व विभागाची तज्ञ टीम हे काम यशस्वीरित्या करत असून काम करण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट व विश्वस्तांचे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे संपूर्ण काम नोव्हेंबर अखेर पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पुरातत्व रसायनज्ञ उपाध्यक्ष मिश्रा यांनी सांगितले. तसेच मंदिराच्या बाहेरील बाजूस झळाळी देण्याचे काम पुढील टप्प्यात होणार असून यासाठी स्वतंत्र निधी पुरातत्व खात्याला मिळेल असे संकेत आहे. एकदंरीत त्र्यंबकेश्वर मंदिराला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प औरंगाबाद येथील पुरातत्त्व खात्याने केला आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या