Saturday, July 13, 2024
Homeमुख्य बातम्यारामकुंडाच्या काँक्रिटचा प्रश्न सुटेना!

रामकुंडाच्या काँक्रिटचा प्रश्न सुटेना!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

रामकुंडासह विविध कुंडांतील काँक्रिट काढण्याच्या प्रश्नावर परस्पर विरोधी भूमिका आल्याने जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या स्थगितीलाही मोठा कालावधी लोटला आहे. त्यावर निर्णय घेतला जात नसल्याने हा प्रश्न पावसाळ्यात मार्गी लावणार काय? असा सवाल गोदा प्रेमींद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.

रामकुंडातील काँक्रीट काढण्याच्या मुद्द्यावरून स्मार्ट सिटी कार्यालयात बैठक झाली होती. त्यात मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.गोदावरीप्रेमींनी त्रिस्तरीय समितीच्या सूचनेनुसार काँक्रीट काढण्याची भूमिका ठामपणे मांडली होती.दुसरीकडे पुरोहित संघ,जीवरक्षक, स्थानिक नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविला होता. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्तात रामकुंडातील काँक्रिट काढण्यावर स्मार्टसिटीने भूमिका स्पष्ट केली आहे. केवळ गोदावरीच्या आवर्तनाचा आढावा घेण्यात येईल असे सांगण्यात आले.मात्र या प्रश्नावर सर्वाच्या समन्वयातून कार्यवाही करण्याची सूचना देत जिल्हाधिकार्‍यांनी काँक्रीट काढण्याच्या कामाला स्थगिती दिली होती.

गोदावरी प्रेमींच्या सातत्याच्या मागणीनंतर रामकूंडासह 12 कुंडातील काँक्रीट काढण्याला रामकुंडापासून प्रारंभ करण्याची मागणी गोदाप्रेमींनी सातत्याने केली होती. रामकुंडासह 12 कुंडातील काँक्रीट काढण्याबाबत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या त्रिसदस्यीय समितीने अहवालाद्वारे काँक्रीट काढण्याची सूचना स्मार्टसिटीला केली आहे.हा निर्णय समितीने एकतर्फी घेतल्याचा आरोप करुन, पुरोहित संघासह पंचवटी सिटिझन फोरम, आदिवासी जीवरक्षक दल, स्थानिक नागरिकांनी विरोध केला होता.

त्रिस्तरीय समिती सदस्य असलेले जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त व मनपा आयुक्त यांची काँक्रीट काढण्यासंदर्भात 17 फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या बैठकीत काँक्रीट काढण्याची सूचना केली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती काँक्रीट काढण्याच्या सूचना स्मार्ट सिटीला प्राप्त झाल्याने या दृष्टीने स्मार्ट सिटीने पावले उचलण्यास सुरुवातही केली होती.

दरम्यान, गोदाप्रेमींच्यानुसार जिवंत झर्‍यातून येणार्‍या पाण्यामुळे रामकुंडाला ‘रामतीर्थ’ संबोधले जाते. मात्र ते जिवंत झरेच काँक्रीटमुळे बंद झाल्याने ‘रामतीर्थ’ नावाला लौकिकार्थ प्राप्त होत नाही. काही लोकांच्या विरोधामुळे रामतीर्थाचे गत वैभव पुन्हा महत्व मिळवून देण्यासाठी काँक्रीट काढणे गरजेचे असल्याची भूमिका गोदाप्रेमी देवांग जानी यांनी मांंडली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या