Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याExclusive Interview : भाषा, संस्कृती आणि वाङ्मयाला संमेलन प्रेरणा देईल!

Exclusive Interview : भाषा, संस्कृती आणि वाङ्मयाला संमेलन प्रेरणा देईल!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज नाशिकमध्ये 94 व्या साहित्य संमेलनाला 94th Marathi Literary Convention सुरुवात होत आहे. या संमेलनाचे आणि नाशिकचे वेगळेपण, संमेलनातील विविध कार्यक्रम, त्यातील तरुणाईचा सहभाग या व अशाच मुद्यांवर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील President of Akhil Bhartiya Marathi Sahitya Mahamandal Kautikrao Thale-Patil यांच्याशी ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी साधलेला संवाद..

- Advertisement -

नाशिक ही कविवर्य कुसुमाग्रजांची भूमी. कुसुमाग्रजांविषयी केवळ नाशिककरांनाच नव्हे तर राज्यातील साहित्यसृष्टीलाही आदर आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक चेहरा म्हणूनच कुसुमाग्रजांकडे पाहिले जाते. त्याच भावनेतून नाशिकला साहित्य संमेलन भरवण्यास साहित्य महामंडळाने परवानगी दिली. यंदाच्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. एका परीने साहित्य आणि खगोलशास्त्र यांना परस्पर निकट आणण्याचा विचार त्यामागे आहे. त्यामुळे हे साहित्य संमेलन अत्युच्च दर्जाचे व्हावे अशी साहित्य महामंडळाची अपेक्षा होती आणि त्यादृष्टीने सर्व ते सहकार्य करण्याची महामंडळाची भूमिका होती आणि आहे.

पण मध्येच करोनाने खीळ घातली आणि साहित्य संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले गेले होते. त्यामुळे मी अस्वस्थ झालो होतो. आपण अशा काळात संमेलनाध्यक्षांना अडकवून ठेवले अशी भावना प्रबळ होत होती. वय आणि काहीसे प्रकृती अस्वास्थ्य असतानाही डॉ. नारळीकरांनी महामंडळाच्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारले होते. त्यामुळे काहीही करून हे संमेलन व्हावे आणि ते दर्जेदार व्हावे अशीच इच्छा होती. त्यामुळे जेव्हा जेव्हा करोनाचा प्रभाव काहीसा कमी होत होता तेव्हा तेव्हा मी नाशिककर आयोजकांशी संपर्क साधत होतो. संमेलन लवकरात लवकर व्हावे, असा आग्रह धरत होतो. काही तारखाही देत होतो. त्या तारखा आयोजक मान्यही करत होते. त्या तारखांना संमेलन झाले असते तर अधिक चांगले झाले असते. पण अखेर ते आता होत आहे हीच आनंदाची बाब आहे.

नाशिककर हे संमेलन यशस्वी करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. नाशिकला साहित्याची फार मोठी परंपरा आहे. ती सर्वज्ञात आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना ब्रिटीश काळात झाली हे आपण जाणतोच. ब्रिटीश महिला मिसेस फराना यांचा त्यात मोठा सहभाग होता. त्याकाळी ज्या काही थोड्या इंग्रज महिला मराठी वाचत आणि लिहित त्यात फराना यांचे नाव आघाडीवर होते. वाचनालयाची परंपरा कुसुमाग्रज, वसंतराव कानेटकर, डॉ. अ. वा. वर्टी यांच्यासारख्या जाणत्यांमुळे अधिकाधिक समृद्ध होत गेली. नाशिक आणि परिसरात अनेक तरुण कवी, लेखक सकस लेखन करत आहेत. त्यांच्या प्रतिभेला वाव मिळेल.

संमेलनाच्या निमित्ताने अनेक मोठे साहित्यिक, लेखक नाशिकला येतील. त्यांचा सहवास आणि मार्गदर्शन तरुण साहित्यिकांना मिळेल. नाशिक परिसरातील नवसाहित्यिकांना प्रेरणा मिळावी आणि साहित्याचा हा प्रवाह पुढे सुरूच राहावा असेच प्रयत्न या संंमेलनामधून होणार आहेत.

संमेलन वाङ्मयीनदृष्ट्या दर्जेदार व्हायला हवे. निवास आणि भोजनाची चांगली सोय असली तर उत्तमच. पण तशी ती नसली तरी फारसे काही बिघडत नाही. साहित्य संमेलनातून साहित्याची परंपरा पुढे कशी जाते ते सर्वाधिक महत्त्वाचे आहे. कारण दर्जेदार साहित्य शाश्वत असतेे. संमेलनाने लेखक, साहित्यिक, कवी आणि वाचकांना काय दिले? संमेलनातून उगवत्या पिढीवर साहित्याचे संस्कार कसे झाले? किती लोकांनी चांगली पुस्तके विकत घेतली? वाचक घडवायला आणि वाचन चळवळ रुजवायला किती मदत झाली? हे जास्त महत्त्वाचे आहे. भाषा, संस्कृती आणि वाङ्मय यांना प्रेरणा देणे हा संमेलनाचा एक महत्त्वाचा उद्देश असतोे.

नाशिकचे संमेलन त्याच दिशेने जाणारे आहे. सामान्य माणसाच्या जगण्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर तिथे चर्चा होणार आहे. मराठी भाषेला, वाङ्मयाला नवी दृष्टी देण्याचे काम हे संमेलन करणार आहे. ‘लक्ष्यवेधी कवी’ या परिसंवादातून नवोदित कवींची ओळख साहित्य रसिकांना करून दिली जाणार आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांचे यथार्थ दर्शन घडवण्यासाठी एक परिसंवाद आहे.

शेतकर्‍यांच्या समस्यांवर लेखक, कवी, साहित्यिक मौन पाळतात, असा आजवरचा अनुभव आहे. शेतकर्‍यांच्या परिसंवादातून या परिस्थितीकडे साहित्यविश्व कसे बघते ही चर्चा त्यातून अपेक्षित आहे. खरा कलावंत, लेखक आणि कवी निर्भिड असतो. त्यांनीच प्रशासनाला प्रश्न विचारायचे असतात हे यातून अनुभवास येईल, अशी अपेक्षा आहे. लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र ‘स्मृतिचित्रे’ यावर वेगळ्या पद्धतीची चर्चा आहे. दुर्मिळ पुस्तकांवरील चर्चेचा हा एखाद-दुसराच प्रयोग असावा. जे अभिजात साहित्य आहे त्याची ओळख पुढच्या पिढीला करून देण्याचा धडा घालून देण्याचा हा प्रयत्न आहे. हे झाले उदाहरणादाखल. अन्य सगळे कार्यक्रमही त्याच दिशेने जाणारे आहेत.

जे उद्याचे साहित्यविश्व घडवणार आहेत ती तरुण पिढीही संमेलनाला असणार आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. भाषा समृद्ध केव्हा राहते? ती तुमची व्यवहारभाषा होते तेव्हाच. निदान महाराष्ट्रात तरी माझे सगळे व्यवहार मराठी भाषेतूनच व्हावे यासाठी तरुणाईने पुढाकार घ्यायला हवा. इतर भाषिकांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून देण्यासाठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, हेही तितकेच महत्त्वाचे नाही का? आता सगळे अडथळे पार करून हे संमेलन होत आहे. नाशिककर त्याला भरभरून प्रतिसाद देतील याची खात्री आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या