Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिककरांना पुन्हा टोईंगचा जाच

नाशिककरांना पुन्हा टोईंगचा जाच

नाशिक । प्रतिनिधी

शहरात बेशिस्त पार्किंगमधील वाहने टोइंग करण्याचा निर्णय पुन्हा पोलीस प्रशासनाने घेतला असल्याने नाशिककरांना पुन्हा टोईंगच्या जाचाला सामोरे जावे लागणार आहे. यासाठी हरकती मागवण्यात आल्या असून पार्किंगच्या विषयावरून नागरिकांचा यास विरोध आहे. मुळात लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर वाहनेच नसल्याने टोईंग ठेक्याचा अट्टहास का होतोय यावरूनच नागरिकांमध्ये संभ्रम आहे.

- Advertisement -

पोलीस आयुक्तालयाकडून एका खासगी कंपनीला ठेका देण्यात आला आहे. शहरात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्याच्या उदात्त हेतूने तीन महिन्यांसाठी पुन्हा टोइंग कारवाई पहिल्या टप्प्यात येत्या 15 दिवसांत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून सुरू केली जाणार आहे. यासाठी एका खासगी ठेकेदाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, आयुक्तालयाकडून येत्या 15 दिवसांत टोइंगच्या कारवाईबाबत हरकती मागविण्यात आल्या आहेत. यंदा टोइंग कारवाईत ज्या कोणाची दुचाकी सापडली त्या दुचाकी मालकाला 290, तसेच तीनचाकी वाहनचालकाला 201 आणि चारचाकी चालकाला थेट 550 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. 2019 साली टोइंग कारवाई चांगलीच वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.

टोइंग व्हॅनवरील सेवकांंचे अरेरावीचे वर्तन, नियमबाह्य कारवाई, आर्थिक गैरव्यवहार, असभ्य वागणे, वाहनांचे होणारे नुकसान असे एक ना अनेक कारणांमुळे टोइंग नाशकातून शहर पोलिसांना हद्दपार करावी लागली होती.

ऑक्टोबर 2019 ला टोइंग कारवाई पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा वाहतूक पोलिसांनी टोइंग कारवाई सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कायदेशीर बाबींची पूर्तता करुन शहर वाहतूक पोलिसांनी टोइंगचा ठेका दिला आहे. नागरिकांनी शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या नावे पोलीस आयुक्त कार्यालय, तळ मजला येथे लेखी हरकती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पार्किंग प्रश्न पहिला सोडवा

एकीकडे नाशिक स्मार्ट होत असल्याचे सांगितले जात असून दुसरीकडे नाशकात अधिकृत पार्किंग अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने विविध रस्त्यांच्याकडेला वाहने उभी करावी लागतात. आशा स्थितीत पोलीस प्रशासनाकडून टोइंग मोहीम राबविण्यात येत असल्याने पुन्हा एकदा नाशिककरांच्या रोषाचा सामना पोलीस प्रशासनाला करावा लागण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या