Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारट्रॉलाच्या धडकेने प्रवेशद्वार तुटले

ट्रॉलाच्या धडकेने प्रवेशद्वार तुटले

नवापूर । श.प्र. Navapur

पोकलेन मशिन असलेला ट्रॉला आमलाण गावातून जात असतांना गावाच्या प्रवेशद्वाराला पोकलेनमुळे कमान तुटल्याने बैलगाडीने जाणारा शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर बैलगाडीचे तुकडे होवून बैलही जखमी झाले आहेत.

- Advertisement -

तालुक्यातील आमलाण गावातील प्रवेशद्वारामध्ये ट्रॉला घुसल्याने प्रवेशद्वार कोसळले. यावेळी बैलगाडीतून शेतात जाणारे शेतकरी ऐमथा धेड्या वसावे (वय 55, रा.आमलाण) यांच्या अंगावर प्रवेशद्वार पडल्याने ते जखमी झाले आहेत. डोक्याला देखील गंभीर दुखापत झाली. वसावे यांना उपचारासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात बैलगाडीचे दोन तुकडे झाले आहेत.

ट्रॉला (क्रमांक जी जे 25 यु 5838) पोकलेन मशिन अमरावतीहून गुजरात राज्यातील वडोदरा घेऊन जात असताना आमलाण गावातील प्रवेशद्वाराचा अंदाज न आल्याने ट्रॉलावरील पोकलेन मशिनने प्रवेशद्वाराची कमान तुटल्याने बैलगाडीने जात असलेल्या शेतकर्‍याच्या अंगावर कमान पडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्यासोबत त्याची बैलजोडीही जखमी झाली आहे. ग्रामस्थांनी अर्ध्यातासाच्या शर्तीच्या प्रयत्नाने त्यांच्या अंगावरील प्रवेशद्वार बाजूला केले.

खाजगी वाहनातून शेतकर्‍याला रूग्णालयात पाठवण्यात आले. तात्काळ घटनास्थळी नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी भेट देवून माहिती जाणून घेतली. पंचनामा करण्यात आला. योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. ग्रामस्थांनी जोपर्यंत शेतकर्‍यांला नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत ट्रॉला जाऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. जखमी शेतकर्‍याची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे.

आमलाण गाव महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भागात येत असल्याने ट्रक चालक आरटीओ टॅक्स बुडविण्याच्या नादात शॉर्टकट मार्ग अवलंबत असल्याने अशा घटना गावात नेहमीच घडतात. एक वर्षापूर्वी अवजड वाहनाने गावातील विद्युत तार तोडल्याने अपघात झाला होता. गावातील ग्रामस्थांनी गावातून गुजरात राज्यात जाणारी वाहतूक बंद करण्याची तक्रार केली होती. परंतू ठोस उपाययोजना झाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या