Friday, May 3, 2024
Homeनाशिकजनतेच्या विकासासाठी सरकार कटीबध्द

जनतेच्या विकासासाठी सरकार कटीबध्द

नाशिक । प्रतिनिधी नाशिक

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने एक वर्षाच्या कालावधीत जनतेची मने जिंकून सर्वांना आपलेसे केले आहे.

- Advertisement -

करोना काळात सरकारने कोणतीही मदत नसताना चांगले काम उभे केले. रुग्णांना आधार दिला. हे फार मोठे यश सरकारला मिळाले. विकासकामांनाही आता हळूहळू सुरुवात होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्ती निमित्त ना. झिरवाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत सरकार स्थापन झाले. जनतेची इच्छा आणि आदरणीय शरदचंद्र पवार यांचे आदेश यामुळे महाविकास आघाडी तयार झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आघाडी होते किंवा नाही याबाबत आम्हालाही शंका होती. अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. परंतू आदरणीय शरद पवार यांनी ही मोट बांधली आणि बघता बघता सरकार स्थापन झाले. सरकार हे तीन पायाचे असल्याने जनतेचा आधार मिळाला आणि सुरुवातीला आलेल्या अडचणीवर मात करत सरकारने एक वर्ष पूर्ण केले.

सन्मानिय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री ना. छगन भुजबळ, शिवसेना नेते संजय राऊत, खा. सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आदी सर्वच ज्येष्ठश्रेष्ठ नेत्यांनी एकमेंकाशी समन्वय साधत आघाडीचे सरकार पुढे नेले.

विरोधकांनी संभ्रम पसरण्याचा प्रयत्न केला. तसेच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतू आम्ही विकासाला महत्व दिले. जनतेच्या आरोग्याला महत्व दिले. सरकार स्थापन झाले आणि करोनाचा प्रादुर्भाव झाला. ऐवढ्या मोठ्या लोकसंख्येचे राज्य आणि मोठ्या संख्याची मुंबई हादरली. परंतू आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अंत्यत उत्कृष्ट नियोजन केले आणि करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्यापासून वाचवले.

रुग्ण संख्या सुध्दा आटोक्यात आणली. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजेश टोपे यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच नेते जनतेच्या आरोग्यासाठी झटले. विरोधकांनी या काळातही महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न करुन टिका केली. परंतू महाविकास आघाडीतील प्रत्येक घटकाला सत्तेपेक्षा जनतेचे आरोग्य महत्वाचे वाटल्याने त्यांनी जनतेलाच प्राधान्य दिले. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊस, महापूर, वादळ यामुळे राज्याला पुन्हा संकटाचा सामना करावा लागला.

परंतू तरीही महाविकास आघाडीचे सर्वच मंत्री, लोकप्रतिनिधी, पक्षाचे सहकारी हे घराबाहेर पडले आणि त्यांनी शेतकर्‍यांचे, जनतेचे स्वात्वंन केले. आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुध्दा वाढत्या वयाची आणि करोना प्रादुर्भावाची भिती न बाळगता जनतेत गेले आणि शेतकर्‍यांना दिलासा दिला. शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून ते हळहळले. त्यांनी शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रु पुसले. शेतकर्‍यांना धीर दिला.

कोणतीही गोष्ट फक्त सत्तेसाठी करायची नसते तर सत्तेतून जनतेचे हित साधायचे असते हेच महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. आपल्याला विधानसभा उपाध्यक्ष पदाची सरकारने संधी दिली ही फार मोठी गोष्ट आहे. एका सामान्य आदिवासी कार्यकर्त्याला विधानसभा उपाध्यक्ष पदाचा बहुमान देणे हे केवळ आघाडी सरकारच करु शकते. या पदाला न्याय देण्याचा मी पुरेपुर प्रयत्न करीत आहेत. आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी काम करीत आहोत.

करोना काळात सर्व निधी आम्ही करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिला. राज्याच्या आर्थिक तिजोरीवर भार आलेला आहे. हा भार आता कमी करण्याचा प्रयत्नही सुरु आहे. करोनाची तिसरी लाट येण्याअगोदर जनतेला सावध केले जात आहे. त्याचबरोबर आम्ही नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुध्दा काम करीत आहोत. महाराष्ट्रातील शेतीचे सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे.

जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे पश्चिम घाटमाथ्यावरील वळणयोजनांना गती देण्याची मागणी केलेली आहे. ना. पाटील यांनी बहुमुल्य वेळ देऊन दिंडोरी, पेठ, सुरगाणा या तालुक्याचा दौरा केला. येथे पडणार्‍या पावसाचा अभ्यास केला. पश्चिम वाहिनी नंद्याचे पाणी पूर्व भागात कसे आणता येईल, याबाबत आपण ना. जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

दिंडोरी तालुक्यातील अंबड, जोरण, गोळशी, हट्टीपाडा, चाफ्याचापाडा, धोंडाळपाडा, आंबेगण, सुरगाणा तालुक्यातील श्री भुवन, घोडी आदी प्रकल्पाची माहिती घेतली. देहरे येेथे ल.पा. योजनेचे भुमीपूजन केले. सुरगाणा, दिंडोरी, पेठ येथील पडणारा पावसाचे मोजमाप करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पश्चिम घाटात जो पाऊस पडतो, त्याचा अभ्यास होवून पूर्व भागात पाणी कसे जाईल, यासाठी त्यांनी स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापनेचे जाहीर केले आहे.

या कार्यालय निर्मित्तीनंतर सर्व पाणी दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवणच्या शेतकर्‍यांना मिळणार आहे. सिंचनाचे प्रकल्प वाढणार आहे. छोटे छोटे केटीवेअर, लघुपाटबंधारे, पाझरतलाव यांची कामे मार्गी लागतील. अनेक नव्या साईट या चारही तालुक्यामध्ये आहेत. त्यांचाही सर्वे होऊन पाणी साठे उपलब्ध केले जातील, या पाणीसाठ्याचा फायदा केवळ दिंडोरी, पेठ, सुरगाणा यांना नसून नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागालाही आहे. गिरणा, मराठवाडा परिसरालाही पाण्याचा लाभ होणार आहे. सुरगाणा,पेठ, दिंडोरीसह पुर्ण राज्यातीलच महिलांच्या डोक्यावरील हंडे कसे उतरतील व त्यांची पाण्यासाठी चाललेली पायपिट कशी थांबेल यासाठी आपले प्रयत्न सुरु रहातील.

यासाठी जेष्ठ नेते श्रीराम शेटे यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी लाभत आहे. सहकार क्षेत्र, आदिवासी भाग आणि बहुजन समाज या सर्वांनाच सामावुन घेऊन विकास साधण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केलेला आहे. यापुढिल काळात जलस्त्रोत बळकटीकरणाबरोबर युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुध्दा प्रयत्न केले जातील.

दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, हरसूल या भागात आदिवासी बांधवांचे मजुरीसाठी स्थलांंतर होत असते. परंतू पुढील काळात स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. अक्राळे एमआयडीसी, पेठ एमआयडीसी येथे नव्याने एमआयडीसी उभे करण्याचे काम सुरु आहे. मोठे प्रकल्प येथे यावे, यासाठी उद्योंजकांशी आपण चर्चा करीत आहोत.

पेठ एमआयडीसीला पाण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी प्रयंत्न सुरु आहे. सर्व महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे सर्वच आमदार, मंत्री, नेते करीत आहेत. हे सरकार जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार असल्याने लोकप्रियंतेच्या शिखरावर पोहचत चालले आहे असेही विधानसभा उपाध्यक्ष ना. नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या