Friday, May 3, 2024
Homeजळगावसक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा- जिल्हाधिकारी

सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी महिलांचा सहभाग महत्वाचा- जिल्हाधिकारी

जळगाव – Jalgaon

सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी पुढाकार घ्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

- Advertisement -

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उप जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव कार्यालयाच्यावतीने निवडणूक प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने जळगाव जिल्हास्तरीय ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते.

याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांचेसह निवडणूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमास मतदार आयकॉन रॅमन मॅगसेस पुरस्कार प्राप्त, पद्मश्री निलिमा मिश्रा, दिव्यांग मतदार आयकॉन मिनाक्षीताई निकम यांच्यासह जिल्ह्यातील मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, बीएलओ, माध्यमांचे प्रतिनिधी आदि ऑनलाईन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी अचूक मतदार यादी महत्वाची असते. याकरीता मतदार नोंदणी करताना ती बिनचूक असावी. यासाठी महिलांसह माध्यमांची भूमिका व योगदान महत्वपूर्ण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच जिल्ह्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यात. यावेळी मतदार नोंदणी कार्यक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या बीएलओचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा येथील बीएलओ सविता माधवराव पाटील तसेच अमळनेर येथील प्रा. जयश्री साळुंखे, तसेच एरंडोल येथील माध्यम प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सुनील सुर्यवंशी यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या