मुंबई | प्रतिनिधी Mumbai
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात शुक्रवारपासून सप्टेंबर महिन्याचा सन्माननिधी थेट जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळी आधीच पैसे जमा करून सरकारने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड केली आहे.
लाडक्या बहिणींना गेल्या काही दिवसांपासून सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यात जमा होणार की नाही? असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला होता. मात्र सामाजिक न्याय विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध करत महिला आणि बालविकास विभागाकडे ४१० कोटी रुपयांचा निधी वर्ग केला. या रकमेतून लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले जात आहेत.
दरम्यान महिला आणि बालविकास खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी दोन महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत एक कोटी महिलांनी ई केवायसी प्रकिया पूर्ण केली आहे. मात्र उर्वरित महिलांना केवायसी अभावी ही रक्कम मिळणार की नाही? अशी शंका उपस्थित केली जात होती.
परंतु ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याची मुदत असल्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याचे महिला आणि बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे.




