Friday, May 3, 2024
Homeनाशिकबेमोसमी पावसामुळे द्राक्ष पंढरी हादरली

बेमोसमी पावसामुळे द्राक्ष पंढरी हादरली

निफाड । Niphad (प्रतिनिधी)

गेल्या सात ते आठ दिवसांपासून तालुक्यात असलेले ढगाळ हवामान आणि दोन दिवसांपासून बेमोसमी पावसाची हजेरी यामुळे निफाडची द्राक्षपंढरी हादरली आहे.

- Advertisement -

प्रतिकूल हवामानामुळे निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात घट होण्याबरोबरच द्राक्षबागांवरील खर्चात वाढ होत आहे. द्राक्षाप्रमाणेच कांदा, भाजीपाला आदी पिकांवर मावा, तुडतुडे आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

जिल्ह्याची द्राक्षपंढरी म्हणून निफाडची ओळख आहे. मागील वर्षी करोना प्रादुर्भावामुळे व्यापारी आपल्या गावी निघून गेल्याने शेतकर्‍यांना द्राक्षपीक मातीमोल भावाने विक्री करावे लागले होते. त्यामुळे यावर्षी शेतकर्‍यांनी द्राक्षबागांसाठी मोठी मेहनत घेतली.

मात्र आताचे ढगाळ हवामान आणि बेमोसमी पाऊस द्राक्षपिकासाठी त्रासदायक ठरू लागला आहे. सोमवारी भल्या पहाटे नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, दिंडोरी, देवगाव, खेडलेझुंगे, शिरवाडे वाकद परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावत शेतकर्‍यांची झोप उडवून दिली. तर निफाडसह शिवरे, विंचूर, नैताळे, गाजरवाडी, कोठुरे, करंजगाव परिसरातदेखील तुरळक सरी बरसल्या.

तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी अर्ली प्लॉट घेतले आहेत. परिणामी अशा द्राक्षमण्यांना तडे जाण्याबरोबरच मावा व भुरीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तर ज्या द्राक्षबागा फुलोर्‍यात व टोकनात आहेत त्यांची मणिगळ व घडकूज होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

साहजिकच प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षबागा वाया जाऊ नये यासाठी शेतकरी दिवस-रात्र कीटकनाशके औषधांची फवारणी करू लागला असून त्यामुळे द्राक्षपिकासाठी खर्च वाढू लागला आहे.

शेतीमालाला योग्य भाव द्यावा : मागील वर्षी करोना प्रादुर्भाव तर यावर्षी प्रतिकूल हवामान, त्यातच केंद्र शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेतकरी अन् शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारने सर्वप्रथम शेतकरी हित पाहिले पाहिजे. शेतीमालाला योग्य भाव दिला पाहिजे. मात्र आज तसे होताना दिसत नाही. नको तेथे वारेमाप खर्च सुरू असून त्याचा बोजा सर्वसामान्य ग्राहकांवर पडत आहे. शेवटी शेतकरी वाचला तर देश वाचेल.

सोपान खालकर, शेतकरी (भेंडाळी)

- Advertisment -

ताज्या बातम्या