दिल्ली । वृत्तसंस्था Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्मविभूषणआशा भोसले यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. भारताने आजवर अनुभवलेल्या अत्यंत दिग्गज आणि अष्टपैलू गायकांपैकी त्या एक होत्या, अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. अनेक दशकांचा प्रदीर्घ काळ व्यापलेल्या त्यांच्या असामान्य सांगितिक प्रवासाने देशाचा सांस्कृतिक वारसा समृद्ध केला आणि जगभरातील अगणित लोकांच्या हृदयाला स्पर्श केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांचे भावस्पर्शी सुरावटींचे गाणे असो वा चैतन्यमयी रचना, त्यांच्या आवाजात एक अजरामर प्रतिभा होती, असे सांगत मोदी यांनी त्यांच्यासोबत झालेल्या संवादाच्या आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधानांनी आशा भोसले यांच्या कुटुंबियांप्रती, त्यांच्या चाहत्यांप्रती आणि संगीतप्रेमींप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या जीवनात सदैव गुंजत राहतील, असेही ते म्हणाले.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने मला तीव्र दुःख झाले आहे. अनेक दशकांचा त्यांचा हा असामान्य प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाची समृद्धी वाढवणारा आणि जगभरातील अगणित लोकांच्या हृदयाला भिडणारा ठरला. त्यांचे भावपूर्ण सुरावटींचे गायन असो वा चैतन्यमयी रचना, त्यांच्या आवाजात एक अजरामर प्रतिभा होती. त्यांच्यासोबत झालेला संवाद सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या आणि संगीतप्रेमींच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी लोकांच्या मनात कायमचे घर करून राहतील.





